बुधवार ठरला ‘बंद’चा वार : पाण्याअभावी दिनचर्या ढेपाळलीअंजनगाव सुर्जी : शहरात बुधवारी शाळाबंद आंदोलनामुळे शुकशुकाट होताच. मात्र, सोबतच पाणी पुरवठा बंद होता आणि व केबल प्रक्षेपणही बंद असल्यामुळे बुधवार हा ‘बंद’चा वार अंजनगाव शहरासाठी ठरला.शाळाबंद असल्याने चिमुकल्यांची पहाटेपासूनच लगबग नव्हती. पाणी पुरवठाही बंद असल्याने नागरिकांची दिनचर्याही थंड होती. भरीस भर म्हणजे मनोरंजनाचे निवडक चॅनेल सुध्दा बंद असल्याने बुधवारी शहरवासियांनी तिहेरी बंद अनुभवला. नागरिकांनी केबल प्रक्षेपण आणि पाणी पुरवठ्याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता सायंकाळपर्यंत या दोन्ही सेवा नियमित होतील, असे सांगण्यात आले. राज्याच्या शिक्षण खात्यातर्फे शिक्षकांविरोधात सातत्याने अन्यायकारक धोरण राबविले जात असल्याने शिक्षणबचाव कृती समितीने दोन दिवस शाळा बंदचे आंदोलन पुकारले आहे. यामुळे बहुतांश शाळांची वर्दळ आज बंद होती. सोबतच जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वसुलीवर अवलंबून असल्यामुळे व इतर अनेक कारणांसाठी या कर्मचाऱ्यांनी शहरात पाणी पुरवठा केला नाही. यामुळे मंगळवारपासूनच शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाला होता. मंगळवारी अवघे अर्धा तास पिण्याचे पाणी मिळाले. बुधवारी सकाळपासून तर पाण्याचा थेंबही नव्हता. यामुळे शहरवासियांची कुचंबणा झाली. शाळांबद असल्याने विद्यार्थी देखील घरीच होते. मात्र, केबल प्रक्षेपणही बंद असल्याने विद्यार्थ्यांनी इतर खेळांकडे मोर्चा वळविला. पाणी नसल्याने गृहिणींची तारांबळ झाली. एकूणच बुधवार हा दिवस तालुक्यासाठी बंदचा दिवस ठरला. यापुढे पाणी पुरवठा दर बुधवारी बंद राहणार असल्याने नागरिकांना अडचण सोसावी लागणार आहे. गुरूवारी देखील शाळाबंद राहणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)
अंजनगावात शाळा, नळ, केबल प्रक्षेपणही बंद!
By admin | Updated: December 10, 2015 00:21 IST