वाहतुकीला अडथळा : अपघाताचा वाढला धोका वरूड : येथील अत्यंत वर्दळीच्या चौकासह राज्य महामार्गावर, अॅप्रोच मार्ग आणि जायन्ट्स चौक परिसरात मोकाट गाई, म्हशी आदी जनावरे रस्त्याच्या मध्यभागी बस्ता मांडत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता असते. परंतु अशा ठिकाणी अपघात घडल्यास दोष कुणाचा, हा चर्चेचा विषय बनला आहे. नगरपरिषद प्रशासनाने शहरातील बेवारस जनावर मालकांना जाहीर सूचना देऊन कारवाई करण्याबाबत सांगूनही महामार्गावर जनावरांचा मोर्चा कायम असतो, हे विशेष. दरवर्षीप्रमाणे जनावरांनी पावसाळ्यात आपला मोर्चा राज्य महामार्गावर वळवून रस्ते अडविण्याचा प्रकार अलीकडे वाढला आहे. शहरातील विश्रामगृह परिसर, बसस्थानक, चुडामणी नदीवरील पूल, पांढुर्णा चौक, जायन्ट्स चौक तसेच शहरातील अत्यंत वर्दळीच्या अॅप्रोच रस्त्यावर जनावरांचे जत्थेच्या जत्थे मध्यभागी ठाण मांडून बसतात. यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. प्रसंगी वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडतात. मात्र, कारवाई वाहनचालकावर होते, ही शोकांतिका आहे. रस्त्यावर जनावरे बसू देऊ नयेत, अन्यथा जनावरांच्या मालकावर कारवाई केली जाईल, अशा सूचना नगरपरिषदेने दिल्या असल्या तरी परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही. अमरावती-पांढुर्णा राज्य महामार्गावर महात्मा फुले महाविद्यालय, न्यू आॅरेंजसिटी कॉन्व्हेंट, न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल, महिला महाविद्यालय, आयएमएस कॉलेज, जे.जे. खेरडे प्राथमिक शाळा, एनटीआर हायस्कूल, जागृत विद्यालय आदी शाळा आहेत. शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व पालकांची गर्दी या रस्त्यावर असते. मोकाट जनावरांना आवर घालणार तरी कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)
राज्य महामार्गावर जनावरांचा ठिय्या
By admin | Updated: August 9, 2015 00:32 IST