महापालिका शहरी बेघर निवारा केंद्राचे प्रयत्न, वर्षभर देखभाल
बडनेरा : अमरावतीच्या बेलपुरा भागात २६ एप्रिल २०२० रोजी रात्री ९.३० च्या सुमारास एक वृद्धा आजारी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडली होती. महापालिका शहरी बेघर निवारा केंद्राने वर्षभर या वृद्धेची देखभाल केली. त्यांच्याच प्रयत्नांतून ही वृद्धा मंगळवारी कुटुंबात परतली. पार्वताबाई भालेराव (७२) असे या महिलेचे नाव आहे.
अमरावती महापालिकेच्या शहरी बेघर निवारा केंद्राला भ्रमणध्वनीद्वारे माहिती मिळाल्यानंतर चमू बेलपुरा येथील घटनास्थळी पोहोचली आणि आजारी वृद्धेला रात्रीच औषधोपचार केले. यानंतर बडनेरा येथील संत गाडगेबाबा शहरी बेघर लोकांच्या निवारा केंद्रात २६ एप्रिल रोजी तिला ठेवण्यात आले. प्रारंभी त्यांची प्रकृती व्यवस्थित नव्हती. मात्र, सात दिवसांनी आजारातून बाहेर पडल्यानंतर हळूहळू त्यांची आधार केंद्रातील कर्मचाऱ्यांनी विचारपूस चालविली. त्या अचलपूर येथील मिल कॉलनी येथील रहिवासी असल्याचे पुढे आले. त्यानंतर त्यांची सोशल मीडियावर माहिती टाकण्यात आली. महापालिकेचे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे व शहर अभियान व्यवस्थापक भूषण बाळे यांनी ओळख पटली जावी म्हणून मोबाईलवर या वृद्धेचा स्टेटस ठेवला. अचलपूर नगर परिषदेशी संपर्क साधण्यात आला. तेथील शहर अभियान व्यवस्थापक अजय मोरस्कर यांनी अखेर पार्वताबाई भालेराव यांचा पत्ता शोधला. त्यांनी लगोलग संस्थेचे अध्यक्ष राजीव बसवनाथे (रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) यांना ही माहिती कळविली.
शहरी बेघर निवारा केंद्रात एक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या पार्वताबाईंनी दोनदा मृत्यूवर मात केली. निवारावासी ताराबाई व अन्य त्यांची खूप काळजी घ्यायच्या. व्यवस्थापक ज्योती राठोड यांनी तर त्यांची स्वतःची आई म्हणून काळजी घेतली. काळजीवाहक किशोर, रोहित यांचा त्यांच्याशी सेवेतून जिव्हाळा निर्माण झाला होता. ४ मे रोजी पार्वताबाईंना घरची मंडळी घेऊन जायला आल्यावर मी घरी जाणार नाही. मी इथेच राहते, असे त्या वारंवार सांगत होत्या. त्या केंद्र सोडून जात असताना उपस्थितांचे मन हेलावून गेले आणि कंठ दाटून आला. काहींच्या डोळ्यातून नकळत अश्रू आले.
महापालिका राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीद्वारे संचालित आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा, संत गाडगेबाबा शहरी बेघर लोकांसाठी निवारा परतवाडा, अचलपूर यांच्या संयुक्त प्रयत्नाने पुन्हा आजीबाईंना घरी परत जाता आले, हे विशेष.
---------------
पार्वताबाई या नागपूर येथून आल्या होत्या. आजारी असल्याने त्या रस्ता भटकल्या व बेलपुरा भागात आढळल्या. वर्षभरानंतर त्यांची मुलगा व मुलीशी भेट झाल्याचा आम्हाला आनंद आहे. शासनाच्या योजनेमुळे बेघर बांधवांना लाभ होत आहे.
- राजीव बसवनाथे, अध्यक्ष, आधार केंद्र