अमरावती : शुक्रवारी तासभर पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र उन्हामुळे निर्माण झालेल्या उकाड्यापासून अमरावतीकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीत मान्सूनपूर्व पाऊस पडत असून १५ जूननंतर मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञाने वर्तविली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस पडल्याने शहर जलमय झाले होते. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. मृग नक्षत्राला सुरुवात होताच गुरुवार व शुक्रवारी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे पावसाळ्याला सुरुवात झाल्याचाही आनंदही नागरिकांमध्ये दिसत होता. तासभर पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आता नागरिक मान्सूनची प्रतीक्षा करीत आहे. (प्रतिनिधी)१२ ते १६ जूनपर्यंत विदर्भात पाऊसआसाम मेघालयावर चक्राकार वारे वाहत असून मुंबई ते केरळ किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनची पूर्व, पश्चिम धुरी कोकणपर्यंत सरकली आहे. तसेच हवेच्या वरच्या थरात पश्चिम बंगाल, बंगाल आणि आजुबाजूला दीड किलोमीटरवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यातच दक्षिण ओरिसा आणि उत्तर आंध्र किनारपट्टीवरसुध्दा चक्राकार वारे आहेत. यामुळे मान्सुनच्या उर्वरित महाराष्ट्रात आगेकूच होण्यास अनुकूल आहे. त्यामुळे १६ जूनपर्यंत विदर्भात मान्सून पोहोचण्याची आशा आहे. १२ ते १६ जूनपर्यंत विदर्भातील अनेक ठिकाणी हलका, मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.
दमदार पावसाने अमरावतीकर सुखावले
By admin | Updated: June 13, 2015 00:29 IST