नरेंद्र जावरे
अमरावती १०८ क्रमांकावर कॉल करा आणि घरपोच रुग्नसेविका पाठविण्याच्या उपक्रमाचा मेळघाटात फज्जा उडाला आहे. चुरणी ग्रामीण रुग्णालयात डिझेलअभावी दहा दिवसांपासून वाहन उभे आहे. याची दखल थेट मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती शीला चव्हाण यांनी घेतली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य मिशन अभियानांतर्गत राज्यभरातील आरोग्य केंद्रांना तत्काळ रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत. १०८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून घरपोच रुग्णवाहिका पाठविली जाते. या स्तुत्य उपक्रमाचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. परंतु चिखलदरा तालुक्याच्या चुरणी ग्रामीण रुग्णालयाला पाठविण्यात आलेली रुग्णवाहिका मागील दहा दिवसांपासून डिझेल नसल्याच्या कारणावरून उभी आहे. ८ जून रोजी कारादा येथील मधु मावस्कर यांची प्रकृती खालावल्यामुळे चुरणी ग्रामीण रुग्णालयात माहिती पाठवून रुग्णवाहिका पाठविण्याची मागणी नातेवाईकांनी केली. परंतु रुग्णवाहिका दुसऱ्या रुग्णाला घेऊन बाहेर गेल्याचे खोटे उत्तर देण्यात आले. मदतीचा हात मागत त्यांनी रात्री १०.३० वाजता युवक काँग्रेसचे महासचिव राहुल येवले यांना माहिती देऊन गाडी पाठविण्याची विनंती केली. त्यावर दुचाकीने सदर रुग्णाला आणून त्यावर उपचार करण्यात आले. प्रत्यक्षात १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका चुरणी ग्रामीण रुग्णालयात उभी होती. येवले यांनी अधिक माहिती घेतली असता खरा प्रकार पुढे आला. सदर वाहनात डिझेलच नसल्याने त्या गॅरेजमध्ये उभे आहेत. कॉल सेंटरवर तांत्रिक बिघाड असल्याचे खोटे कारण सांगण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला. शहरी भागापेक्षा मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात १०८ क्रमांकाची रुग्णसेवा आदिवासींसाठी जीवनदायी ठरत असताना केवळ डिझेलअभावी तीच मृतप्राय झाली आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असून वेळेवर वाहनाची व्यवस्था करताना नातलगांची दमछाक होताना दिसत आहे. याचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे आजाराचे प्रमाण वाढणार असून अशाप्रसंगी रुग्णवाहिका सज्ज ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.