बडनेरा : येथील सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय, भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर वर्धापन दिनाचे औचित्य साधून गुरुवारी दुपारी १२ वाजता सार्वजनिक कपिल बुद्धविहार सभागृहात आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन थाटात झाले. तत्पूर्वी समता रॅली काढण्यात आली. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याच्या स्मृती जागविल्या.
संमेलनाचे उद्घाटन तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. शहीद भीमसैनिकांना मानवंदना देण्यात आली. त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आंबेडकरी कवि ई. मो. नारनवरे, तर उद्घाटन धनराज दहाट यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून भदंत सुमेधबोधी महाथेरो, नांदेड येथील विवेक मवाडे हे उपस्थित होते.
बिजभाषण वसंत शेंडे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून सुदाम साेनुले, निशा शेंडे, दिलीप एडतकर, नगरसवेक प्रकाश बनसोड, पुष्पा बोरकर, धर्मशील गेडाम उपस्थित होते. संचालन विलास थोरात, तर आभार प्रदर्शन प्रकाश बाेरकर यांनी केले. उद्घाटनानंतर दुसऱ्या सत्रात पथनाट्य, परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. संमेलनात सुरेश दहाट, बाळू बनसोड, जी.एस. घरडे, रवींद्र गेडाम, दिगांबर झाडे, माया वासनिक- गेडाम, संध्या खांडेकर, मदन खंडारे, पुंजाजी ठवरे आदी उपस्थित होते.