राजेश जवंजाळ - अमरावतीअसे म्हणतात की कलावंताला जात किंवा धर्म नसतो. कलेच्या संवर्धनासाठी जीवन वेचणे हाच त्याचा खरा धर्म असतो. कलावंतांची खाण असलेल्या अमरावतीच्या मागासवस्तीमध्ये राहूनही अद्वितीय कलेने भल्याभल्यांचे डोळे दीपविणारे तरीही प्रसिध्दीपासून कोसो दूर असलेल्या सहा कलावंतांचा प्रवास अचंभ्यात टाकणाराच आहे. देवदास, जोधा अकबर, दे दणादण यासारख्या प्रसिध्द हिंदी-मराठी चित्रपटांचे विशाल, नयनाभिराम सेट, पुणे-मुंबईतील प्रसिध्द गणेश मंडळांंचे देखावे तयार करणारे कलावंत अमरावती शहरातील आहेत, यावर प्रथमदर्शनी कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण, हे सत्य आहे. अमरावतीच्या मागास वस्त्यांमध्ये राहून हे कलावंत त्यांच्या कलेचा सुगंध सबंध महाराष्ट्रभर दरवळत असतानाही ते प्रसिध्दीच्या कोसो दूर आहेत. संजय रंगारे, सचिन रामटेके, शिवा प्रजापती, विवेक पाळदकर, राहुल जुमळे व अमोल इंगळे अशी या कलावंतांची नावे आहेत. या कलावंतांचे हात सध्या अमरावतीतील प्रसिध्द आझाद हिंद मंडळाचा अजिंठा लेण्यांचा कोरीव देखावा तयार करण्यात गुंतले आहेत. आश्चर्याने तोंडात बोटे घालावयास लावणारी सुरेख कलाकुसर या कलावंतांनी दीड महिन्यांच्या प्रदीर्घ परिश्रमातून साकारली आहे. ‘स्कल्पचर’ हा या कलेचा प्रकार आहे.संजय लक्ष्मण रंगारे यांच्या नेतृत्त्वात ३० कलावंतांच्या चमुने आझाद हिंद मंडळाचा देखावा तयार करण्यासाठी श्रम खर्ची घातले आहेत. संजय हा यशोदानगरनजीकच्या उत्तमनगरातील रहिवासी आहे. तो बालवयापासूनच मुंबईच्या चित्रपट नगरीत वास्तव्याला होता. तिथे तो चित्रपटगृहांवर लावण्यात येणारे चित्रपटांचे पोस्टर, बॅनर तयार करण्याचे काम करीत होता. हा व्यवसाय सुमारे २५-३० वर्षांपूर्वीपर्यंत अमरावतीतही मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे गावाकडे जाऊन कलेची जोपासना करता येईल, या उद्देशाने तो अमरावतीत स्थायिक झाला. कालांतराने आधुनिक संगणकीय प्रणाली आल्याने शहरातील चित्रपटांचे पोस्टर, बॅनर तयार करण्याचे काम बंद झाले. परिणामी या व्यवसायावर अवकळा आली. परंतु अंगभूत कला असलेला माणूस कधीच उपाशी मरत नाही, या उक्तीप्रमाणे संजयलाही त्याच्या कलेनेच तारले. मुंबईतील त्याच्या जुन्या कलावंतांच्या मदतीने त्याने चित्रपटांचे सेट तयार करण्यास सुरूवात केली. गतवर्षी संजयने मुंबईतील कुख्यात डॉन ‘छोटा राजन’ याच्या गणेश मंडळात बॉलीवुडचा देखावा व त्याअगोदर धारावीच्या गणेश मंडळाचा बर्फाच्छादित डोंगरातील शिवलिंगाचा आकर्षक देखावा कुशलतेने तयार केला होता.दिल्लीतील प्रसिध्द हॉटेल ‘किंगडम आॅफ ड्रीम’ मध्ये संजयने २७ राष्ट्रांचे महत्त्वाचे देखावे तयार केले आहेत. सध्या शहरात इंटीरीयर डेकोरेशनचे काम करून संजयचा उदरनिर्वाह सुरू आहे. आझाद हिंद मंडळाचे सोमेश्वर पुसतकर यांनी या कलावंताला हेरले. अंबानगरीतील कलावंतांचा सन्मान अमरावतीतही व्हावा, हजारो लोकांना त्यांच्या कलेची महती कळावी, एरवी पडद्यामागे राबणाऱ्या त्यांच्या हातगुणाला रसिकांनी वाखाणावे, या उद्देशाने पुसतकर यांनी संजय रंगारेसमोर आझाद गणेश मंडळाचा यंदाचा ‘अजिंठा लेण्यां’चा देखावा तयार करण्याची संकल्पना मांडली. त्याने हे आव्हान स्वीकारले. यासाठी त्याने मुंबईच्या जे.जे. स्कूल आॅफ आर्टच्या सचिन रामटेकेची मदत घेतली. सचिनही यशोदानगरातीलच रहिवासी. सचिन हा कलाक्षेत्रातील शिवा प्रजापती व इतर सवंगड्यासह अजिंठा लेणी साकारण्यास सरसावला. '
अंबानगरीतील कलासक्तांचा ध्येयवेडा प्रवास!
By admin | Updated: August 30, 2014 23:21 IST