वाशिम : महाबिज बियाणे महामंडळाच्या गोडाऊनमधून दरोडेखोरांनी लंपास केलेले २३ लाख रूपये किंमतीचे सोयाबीन व हरभर्याच्या बियाण्यासह अमरावती येथील टायर चोरी व तांदुळ चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याची माहिती पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. गेल्या आठवड्यात महाबीजच्या गोदामामधून दरोडेखोरांनी २३ लाखाचे बियाणे लंपास केले होते. याप्रकरणी पोलीसांनी सोलापूर जिल्ह्यातून दोन आरोपींना अटक करुन मुद्देमालही जप्त केला होता. याबाबत माहीती देताना होळकर म्हणाले की, पोलीस निरिक्षक रऊफ शेख यांच्या पथकाला तपास करत असताना वारना (जि. सोलापुर) येथील वजन काट्यावर दरोडेखोरांनी ट्रकचे वजन केल्याची माहिती मिळाली. वजनकाट्यावर असलेल्या सीसी कॅमेर्यामुळे दरोडेखोरांची ओळख पटली. दरोडेखोरांनी गाडेगाव (ता. बार्शि ) येथील एका टिन शेडमध्ये हरभरा तसेच तेथून काही अंतरावर असलेल्या एका शेततळ्यामध्ये सोयाबीनचे बियाणे दडवून ठेवल्याचे आढळले. याच ठिकाणी अमरावती येथे झालेल्या चोरीमधील मोठय़ा वाहनासाठी लागणारे टायर व तांदुळचा साठाही सापडला. या चोरी प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाबीज बियाणे चोरी प्रकरणासोबतच अमरावतीच्या टायर चोरीचे बिंगही फुटले !
By admin | Updated: May 24, 2016 02:03 IST