अमरावती : शासकीय आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक आहेत. अशातच शेवटच्या या दिवसांत सलग तीन दिवस सरकारी सुट्या आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेसह अन्य शासकीय कार्यालयात शनिवार २७ मार्च रोजी अनेक कर्मचारी अधिकारी पेंडींग कामाचा निपटारा करतांना दिसून आले.
दरवर्षी ३१ मार्च म्हटला की, शासकीय विभागात वर्षभरातील प्रशासकीय कामकाजाची धावपळ सुरू होते. अशातच आता मार्च महिन्याचा अखेरचा आठवडा असल्याने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील प्रशासकीय कामे नवीन आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी निपटारा करणे आवश्यक आहे. यामुळे सुटीच्या दिवशीही जिल्हा परिषदेच्या वित्त, सामान्य प्रशासन, सिंचन, पाणीपुरवठा, आरोग्य, बांधकाम, रोजगार हमी योजना विभाग, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, पंचायत आदी विभागातील ज्या कर्मचाऱ्यांची चालू आर्थिक वर्षातील कामे पेंडिंग आहेत असे कर्मचारी व काही अधिकारी आपल्या विभागात मार्चची कामे निकाली काढण्यासाठी सुटीच्या दिवशी कार्यालयात दिसून आले. विशेष म्हणजे शनिवारही लगबग असली तरी रविवारी होळी आणि सोमवारी रंगपंचमीची सुटी असल्याने या दोन दिवसांत सुट्यांचा वेळ कुटुंबाकरिता देता येऊ शकतो. त्यामुळे अनेकांनी शनिवारी पेंडिंग कामे निकाली काढण्यासाठी शनिवारी सकाळी १० वाजतापासून कार्यालय गाठल्याचे चित्र मिनीमंत्रालयात दिसून आले.