भेटी-गाठी सुरू : हक्काचे मतदार पक्के करण्यावर भरगणेश वासनिक - अमरावतीकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि भाजप- शिवसेना युतीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. अशातच जिल्ह्यातील आठही मतदारसंघातील संभावित उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठींचे सत्र जोरात सुरू केले आहे. आघाडी, युती व्हावी, ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र ‘तुझे माझे जमेना, तुझ्याशिवाय करमेना’ या म्हणीनुसार मतदारसंघ आपल्याच पदरी पडावा, याकरिता नेत्यांकडे इच्छुक उमेदवारांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा खिळल्या आहेत. परंतु विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी, मेळावे, बैठकी, ज्येष्ठांचा सन्मान सोहळा, भूमिपूजन, विकास कामांचे लोकार्पण आदी उपक्रम सातत्याने चालविले आहे. अमरावती, बडनेरा, अचलपूर, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, दर्यापूर व मेळघाट मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी निवडून येण्याची गणिते जुळविण्याची तयारी चालविली आहे. संत, महात्मांच्या जयंती, पुण्यतिथींचे होर्र्डिंग्ज व फ्लेक्स न चुकता लावून संभावित उमेदवार मतदारांचे लक्ष वेधून घेण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. मतदारसंघ व निवडणूक लढविण्याचे निश्चित असल्याने त्या दिशेने इच्छुक उमेदवारांची वाटचाल सरू आहे. सोशल मीडिया, शुभेच्छा पत्रे, मोबाईलवर मॅसेज आदी नवे फंडे वापरले जात आहेत.काँग्रेसने जिल्ह्यातील सहा मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे सत्र आटोपले आहे. यापैकी अमरावती, धामणगाव रेल्वे, तिवसा व मेळघाटात उमेदवारसुद्धा ‘फायनल’ केले आहेत. अचलपूर व दर्यापुरात काही उमेदवारांमध्ये स्पर्धा असून लवकर काँग्रेस पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. आघाडी होईल तेंव्हा होईल, मात्र राष्ट्रवादी कॉग्रेसने देखील आठही मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांनी रितसर प्रक्रिया पार पाडली आहे. आघाडीत अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटला नसताना भाजप- शिवसेना युतीतही हा तिढा कायम आहे. जास्त जागांची मागणी करुन आधी दबावतंत्र व नंतर मवाळ भूमिका घेण्याची तयारी भाजप नेत्यांची असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे महायुतीचे नेते जागा वाटपाच्या चर्चेला एकदा बसले की, क्षणात सर्व वाद संपुष्टात येतील, असा दावा येथील एका भाजपच्या आमदाराने केला आहे. हल्ली भाजप-शिवसेनेच्या वाट्याला असलेले मतदारसंघ हे कायम राहतील, काही मतदारसंघाच्या वाटपात फेरबदलाची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेत उमेदवारीसाठी रस्सीखेच असून केवळ ‘इलेक्टिव्ह मेरीट’ ची जबाबदारी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा खा. आनंदराव अडसूळ यांच्यावर सोपविल्याची माहिती आहे. बडनेरा, तिवसा, दर्यापूर व अचलपुरात परिपूर्ण उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. आघाडी आणि युतीत जागा वाटपाचे सुत्र ठरले नसताना नेत्यांनी ‘कामाला लागा’ असे आदेश दिल्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
आघाडी, युतीच्या उमेदवारांचे ‘वेट अॅन्ड वॉच’
By admin | Updated: August 25, 2014 23:42 IST