स्मार्ट सिटी : २,२६८ कोटींचा फेरप्रस्ताव वादातअमरावती : अवघ्या २२६८ कोटी रूपयांमधून अमरावती शहर ‘स्मार्ट’ करण्याचा आशावाद व्यक्त करीत ‘आलिया कन्सलटन्सी’ने स्मार्ट सिटीच्या फेरप्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. तत्कालीन आयुक्तांनी नकाराची फुली मारल्यानंतर ‘आलिया’ कंपनीच्या पुनर्निवडीमुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. पुन्हा ‘आलिया’च का, याबाबत मात्र प्रशासनाला उत्तर देता आलेले नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अमरावती महापालिका सहभागी झाली. स्मार्ट सिटीचा प्रस्ताव बनविण्यासाठी ‘आलिया’ कन्सलटन्सी या खासगी कंपनीशी करार करण्यात आला. ‘प्रस्ताव कम डीपीआर’ बनविण्यासाठी ‘आलिया’ कन्सल्टन्सीला सुमारे ९० लाख रूपये मोबदला द्यावयाचे ठरले. मात्र, १० लाख रूपयांचा अॅडव्हान्स घेऊनही आलिया कन्सल्टंसीने काम सुरू करण्यास लेटलतिफी केली. तत्कालीन आयुक्तांनी महापालिकेतील यंत्रणेचा आधार घेत ‘आलिया’ कन्सलटन्सीच्या माध्यमातून कसाबसा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाकडे पाठविला. तो प्रस्ताव स्पर्धेत टिकू शकला नाही आणि अमरावती शहराचा स्मार्ट सिटी स्पर्धेत समावेश होऊ शकला नाही. ‘आलिया’ कन्सलटन्सीने या स्पर्धेसाठी तब्बल ५५०० कोटी रूपयांचा प्रस्ताव बनविला होता, हे विशेष. स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात समावेश होऊ न शकलेल्या शहरांना पुन्हा त्रुटीरहित फेरप्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या.डीपीआरची किंमत अर्ध्यावरच आलिया कन्सलटन्सीने अमरावतीचे स्मार्ट सिटीचे स्वप्न ५५०० कोटी रुपयांमध्ये साकारण्याचा दावा पहिल्या टप्प्यात केला होता. त्या प्रस्तावात ग्रीनफिल्ड मॉडेल साकारण्यात आले होते. देशातील ९८ शहरांपैकी बोटावर मोजण्याइतपत शहरांनी ग्रीनफिल्ड मॉडेल साकारुन प्रस्ताव दाखल केला होता.त्यामुळे अमरावतीसारख्या छोट्या शहराचा हा प्रस्ताव पहिल्या टप्प्यात टिकू शकला नाही, असे त्यावेळी सांगण्यात आले.त्यामुळे आता आलिया कन्सलटन्सीने ग्रीनफिल्ड मॉडेलसह रेट्रोफिटींग,रिडेव्हलपमेंट आणि पॅनसिटीचा नव्याने समावेश केला आहे. मात्र, किंमत वाढण्याऐवजी कमी करण्यात आल्याने या प्रस्तावाच्या सर्वसमावेशकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘आलिया’ अंगावर... !
By admin | Updated: June 27, 2016 00:02 IST