परतवाडा : अचलपूर तालुक्यात मंगळवारी दुपारी तुफान पाऊस कोसळला. यामुळे चंद्रभागा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे प्रकल्प ९३ टक्के भरला. यात कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडल्या जाऊ शकतात. या अनुषंगाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील येलकी पूर्णा येथे एका घराची भिंत पडली. ही भिंत बाजूलाच असलेल्या गोठ्यातील गायीच्या अंगावर पडली. यात गाय दबून ठार झाली. कुष्टा बुद्रुक येथेही घराची भिंत पडल्याची सूत्रांनी माहिती दिली. अचलपूर तालुक्यातील शहानूर प्रकल्प ८८ टक्के, तर सपन प्रकल्प ८६ टक्के भरला आहे. या प्रकल्पावर किंवा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. यात या दोन्ही धरणाचे दरवाजे उघडण्याचे कुठलेही नियोजन नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.