आरोपीला अटक : प्रबुध्द नगरातील घटना अमरावती : मद्यपी पित्याने दारूच्या नशेत घरात उलट्या केल्यामुळे मुलाने संतापाच्या भरात त्यांची हत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास वडाळी परिसरातील प्रबुध्दनगरात घडली. महादेव आनंद उघडे (५९) असे मृताचे नाव आहे. फे्रजरपुरा पोलिसांनी आरोपी मुलगा विनोद महादेव उघडे (३०) याला अटक केली आहे. प्रबुध्दनगरातील रहिवासी महादेव उघडे यांचा वडाळी परिसरात सायकल व पंम्चर दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा विनोद उघडे गवंडी काम करतो. महादेवला दारूचे व्यसन असल्याने पिता-पुत्रामध्ये दररोज वाद होत असत. मंगळवारी महादेव यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर घरी जाऊन जेवण करून ते हॉलमध्येच झोपी गेले. दुपारी १.३० वाजता मुलगा विनोद घरी आला. त्याने आईला जेवणाचे ताट वाढून मागितले. दरम्यान मद्याचे अतिसेवन झाल्याने महादेव यांना उलट्या होऊ लागल्या. हा प्रकार पाहून विनोदने संतापाच्या भरात शिवीगाळ केली. दरम्यान त्यांच्यात वाद झाला. भांडण अधिकच वाढले. विनोदने रागाच्या भरात घरातील खलबता वडिलांच्या डोक्यावर हाणला. हवा भरण्याच्या पंपानेही वार केले. त्यामुळे महादेव झाल्याने त्यांचा घरातच मृत्यू झाला. घटनेची माहिती फे्रजरपुरा पोलिसांना मिळताच सहायक पोलीस आयुक्त मोहन जोशी यांच्यासह पोलीस निरीक्षक पी.पी.सोळंके, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी विनोदला ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
मद्यपी पित्याचा मुलानेच केला खून
By admin | Updated: October 21, 2015 00:24 IST