लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मद्यपी भावाला डोक्यात सब्बल घालून जागीच ठार केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास शेगाव येथे घडली. राहुल सुभाष ससाने (४०, रा. शेगाव, अमरावती) असे मृताचे नाव आहे.पोलिसांनी याप्रकरणी आरोपी असलेला धाकटा भाऊ प्रफुल्ल सुभाष ससाने (३४) याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, मृत राहुल याला दारूचे व्यसन जडले होते. दररोज मद्यपान करून तो घरात वाद घालायचा. वृद्ध आई-वडिलांना शिवीगाळ व मारहाण करणे त्याच्यासाठी नित्याचे झाले होते. आठ महिन्यांपूर्वी माहेरी परतलेल्या विवाहित बहिणीलासुद्धा राहूल शिवीगाळ व मारहाण करायचा. बरेचदा तिला जेवण करू देत नव्हता. असे प्रकार नित्याचेच झाले असल्याने या प्रकाराला ससाने कुटुंबीय त्रासले होते. मंगळवारी राहुल हा मद्यपान करून आल्यानंतर त्याने प्रफुल्लशी वाद घातला. यादरम्यान शिवीगाळ करीत असल्याने वाद विकोपाला गेला. अखेर आरोपीने रागाच्या भरात मोठ्या भावाच्या डोक्यावर सब्बलचा जोरदार प्रहार त्याने केला. त्यामुळे राहुल हा जागीच कोसळला.याप्रकरणी प्रफुल्ल ससाने याला गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. सुभाष पाटील, शेखर गेडाम विशाल वाकपांजर यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतकाच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन प्रफुल्लविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती गाडगेनगरचे वरिष्ठ ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली.
शेगाव येथे मद्यपी भावाची डोक्यात सब्बल घालून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:01 IST