हालचाली : विरोधकांमध्ये रणनीतीबाबत चर्चा सुरू अमरावती: जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाचा आवाज सत्तापालट झाल्यापासून दबला होता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांवरही टीका टिप्पणी होत असल्याने आता नव्या दमाने सभागृहात विरोधी पक्ष आक्रमक भूमिका बजाविण्याच्या तयारीत आहेत. त्यादुष्टीने हालचाली सुरू असून लवकरच विरोधक कोअर बैठक घेणार असल्याचे संकेत आहेत.राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य काही पक्ष विरोधात असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. जिल्हा परिषदेवर सध्या काँग्रेस पक्षाच्या हाताच एकहाती सत्ता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत विरोधात असलेल्या शिवसेना, भाजप, प्रहार, रिपाई, बसपा, व काही राष्ट्रवादी कॉग्रेसचे सदस्य विरोधी पक्षात असल्याने विकासाच्या कामात अन्याय होत असल्याने सोबतच जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने सुरू असलेल्या विविध कामावर वॉच ठेवणाऱ्या जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाचा आवाज सत्तापालट झाल्यापासून दबला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांच्या सुरात सुर मिळवीत आहे की काय, अशी चर्चा होती. त्यामुळे उलट-सुलट होणाऱ्या चर्चेला विराम देण्यासाठी जिल्हा परिषदेतील विरोधात असलेल्या ज्येष्ठ नेत्यांनी यावर सोमवारी मंथन केले. यावेळी प्राथमिक स्तरावर झालेल्या चर्चेत विरोधी पक्षाचा आवाज मिनीमंत्रालयत बुलंद करण्याबाबत या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. यावेळी जिल्हा परिषदेत घडलेल्या विविध अनियमितता प्रकरण व इतर विकासाच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची तयारी सुरू केली आहे. लवकरच याबाबत विरोधी पक्षातील सहकाऱ्यांची बैठक होणार आहे. यामध्ये कुठले विषय सभागृहात लावून धरायचे, यावर चर्चा करून आगामी सर्वसाधारण सभेपासून विरोध सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत. (प्रतिनिधी)
मिनी मंत्रालयातील विरोधी पक्ष होणार आक्रमक
By admin | Updated: September 15, 2015 00:16 IST