उकाडा असह्य : मंगळवार, बुधवारी पावसाची शक्यता, आजार बळावले वैभव बाबरेकर अमरावतीपावसाने दांडी मारल्याने उकाडा वाढला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घराच्या आत गुंडाळून ठेवलेले कुलर पुन्हा बाहेर काढण्याची वेळ आली आहे. आठवडाभराच्या अवकाशनंतर मंगळवार व बुधवारी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पावसाळ्याला सुरुवात होताच मुसळधार पावसाने नागरिक सुखावले होते. पावसांचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. मात्र, आठवडाभर पुन्हा पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शहरातील नागरिकांनाही उकाडा असह्य होऊ लागला आहे. सोमवारी जिल्ह्यात कमाल ३७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सूर्याच्या तीव्र किरणामुळे पुन्हा नागरिकांनी दुपट्टे, टोप्या व रुमाल बांधणे सुरु केल्याचेही आढळत आहे. दमदार पावसाची सुरुवात झाल्याने बहुतांश नागरिकांनी कुलर बंद केले होते. मात्र, अचानक आठवडाभरापासून पाऊस गायब झाल्याने पुन्हा वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने कुलर बाहेर काढावे लागले. तसेच शहरातील अनेक शासकीय कार्यालयात एसी व कुलर पूर्वरत सुरु झाल्याचेही दिसून येत आहे. (प्रतिनिधी)बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, मुंबई किनारपट्टीवर कमी दाबाची पट्टा नाही. त्यातच द्रोणीय स्थिती व चक्राकार वारे सुध्दा नाहीत. ही स्थिती बिहार व झांरखड भागात असल्यामुळे तेथे पाऊस पडत आहे. अशी स्थिती निर्माण झाल्यास विदर्भातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत विदर्भातील काही ठिकाणी दमदार पावसाची शक्यता असून त्यानंतर आणखी आठवडाभर उघाड राहण्याची शक्यता आहे. -अनिल बंड, हवामान तज्ज्ञ, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.
पुन्हा निघाले कुलर
By admin | Updated: June 30, 2015 00:36 IST