अमरावती : मथळा पाहून चमकलात ना? पण हे खरे आहे. रुक्मिणीनगरातील मुख्य रस्त्यालगतच्या एका व्यावसायिक संकुलाच्या आवारात हे घडते आहे. जेथे दुपारी चहा मिळतो, तेथेच रात्री अवैध दारूही विकली जाते. उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या त्या परिसरात राजरोसपणे सुरू असलेला 'निसर्गाच्या सान्निध्यातील बार' जसा पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्न उपस्थित करणारा आहे, तसाच तो कायद्याला आव्हान देणाराही ठरला आहे.एका व्यावसायिक संकुलाच्या तळमजल्यातून दारूविक्री केली जाते. दारू खरेदी करणारे तेथेच दारू पितात. चकणा विकणारे दोघे कोपऱ्यात उभे असतात. संकुलातील सर्व दुकाने रात्री बंद झालीत की, सातच्या सुमारास सुरू होणारा हा 'रात्रीचा खेळ' १०.३० ते ११ वाजेपर्यंत चालतो. दुपारी गजबजलेला, प्रतिष्ठित, सुशिक्षित चौक रात्री जणू गुन्हेगारीचा चौक होतो.दारू पिण्यासाठी एकत्रित होणारे बाहेरून येतात. असभ्य वर्तन करीत असल्याने वस्तीतील रहिवाशांना त्यांचा त्रास होतो. महिला, मुलींना त्यामुळे असुरक्षित वाटते. वस्तीतील कुणी हटकले, तर 'ते' लोक अंगावर धावून येतात. नागरिक 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' सहन करीत आहेत.मद्यपींची हिंमत आता वाढली आहे. ते कुठेही दारू पितात, ग्लास नि बॉटल फेकतात, थुंकतात, कुणासमोरही लघवी करतात. या वागणुकीमुळे महिला-पुरुषांना घरातील गॅलरीतही उभे राहता येत नाही. रस्त्यावरून ये-ज़ा करता येत नाही.पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर हे या गंभीर प्रकरणाची दखल घेतील का, असा सवाल वस्तीतील नागरिकांचा आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारतात की दुर्लक्ष करून अवैध व्यवसायाला तेही बळच देतात, याकडे नागरिक लक्ष ठेवून आहेत.चारचाकीतही सेवादारू पिण्यासाठी लोक दुचाकीने आणि चारचाकीनेही तेथे पोहोचतात. चारचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून तीत दारू पाहोचविण्याचीही सोय उपलब्ध आहे. काही मद्यशौकिन तळमजल्यावर दारू पितात. काही रस्त्याच्या कडेला उभे होऊन, कुणी पायऱ्यांवर बसून बिनधास्त मद्यप्राषन करतात. सर्व्हिस लाईन आणि जागा मिळेल तेथे आडोसा घेतला जातो.पोलिसांची चमकोगिरीदारू विक्रीसाठी रात्री तिघे तैनात असतात. चकण्याची पिशवी घेऊन एक माणूस आणि मुलगा काही अंतरावर उभे असतात. हे सारे नियोजित व्यवस्थापनाशिवाय शक्य नाही. पोलिसांनाही त्याची कल्पना आहे. कधी तरी त्यांचे वाहन येते. सर्वांना ते रफादफा करतात. अटक मात्र करीत नाहीत. अर्ध्या तासाने सारे 'जैसे थे!'कुणाच्या भरवशावर?लॉकडाऊनच्या संपूर्ण काळात ही अवैध दारूविक्री अखंडित सुरू आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना भर वस्तीत सुरू असलेली ही दारूविक्री कोरोनाचा प्रसार करीत नाही काय? सामान्यांना नियम आणि अवैध व्यावसायिकांना सूट का?
दुपारी चहा,रात्री दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:01 IST
एका व्यावसायिक संकुलाच्या तळमजल्यातून दारूविक्री केली जाते. दारू खरेदी करणारे तेथेच दारू पितात. चकणा विकणारे दोघे कोपऱ्यात उभे असतात. संकुलातील सर्व दुकाने रात्री बंद झालीत की, सातच्या सुमारास सुरू होणारा हा 'रात्रीचा खेळ' १०.३० ते ११ वाजेपर्यंत चालतो. दुपारी गजबजलेला, प्रतिष्ठित, सुशिक्षित चौक रात्री जणू गुन्हेगारीचा चौक होतो.
दुपारी चहा,रात्री दारू
ठळक मुद्देमिस्टर सीपी, बघा हे पुरावे! : रुक्मिणीनगरातील वास्तव, भर रस्त्यावर मद्य प्राशन