चांदूर रेल्वे : तालुक्यातील मालखेड (रेल्वे) ते कवठा कडू मार्गातील टाकळी तलावात ७० वर्षीय वृद्ध रखवालदार सोमवारी दुपारी बुडाला होता. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता शोध व बचाव पथकाने त्याचा मृतदेह शोधून काढला. उदयभान रामरावजी वानखडे (रा. कुऱ्हा देशमुख, ता. चांदूर बाजार) असे मृताचे नाव आहे.
टाकळी येथील शेतकरी अभिजित बेजलवार यांच्या शेतात उदयभान वानखडे हे सोमवारी दुपारी तलावात आंघोळीला गेले होते. बराच वेळ झाल्यानंतरही ते शेतात परत न आल्यामुळे शेतमालकाने शोध घेतला. मात्र, तलावाच्या आसपाससुद्धा ते मिळून आले नाही. त्यामुळे सायंकाळी त्यांनी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याला माहिती दिली. ठाणेदार मगन मेहते यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व शोध घेतला. ते तलावात बुडाल्याचा कयास बांधला व चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांना दिली. राजेंद्र इंगळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा शोध व बचाव पथकाला पाचारण केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर व पोलीस निरीक्षक मारुती नेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सकाळी ८.३० वाजता रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. तीन तासांनी उदयभान वानखडे यांचा मृतदेह शोध व बचाव पथकाच्या हाती लागला. घटनास्थळी चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते, एपीआय अनिल पवार, एएसआय संजय राठोड, कॉन्स्टेबल आशिष राऊत, चालक पंकज शेंडे, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी अमोल देशमुख, तलाठी प्रफुल्ल गेडाम, पोलीस पाटील माहुरे आदी उपस्थित होते.
यांनी शोधला मृतदेह
जिल्हा शोध व बचाव पथकातील देवानंद भुजाडे, कौस्तुभ वैद्य, भूषण वैद्य, गजानन वाडेकर, हिरालाल पवार, पंकज येवले, अजय आसोले, महेश मांदाळे, प्रफुल्ल भुसारी, राजू देवरे (चालक), पुरुषोत्तम पुराम (चालक) यांनी मृतदेह शोधून काढला.
070921\img-20210907-wa0018.jpg~070921\img-20210907-wa0019.jpg
photo~photo