अमरावती : इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल आॅनलाईन जाहीर झाला; मात्र गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. गुणपडताळणी झाल्यानंतर यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची सूचना आॅनलाईन निकाल पत्रिकेवर दिली आहे. गेल्यावर्षी निकालात झालेल्या चुकांमुळे यावर्षी ही काळजी घेण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. हा निकाल बघण्यासाठी दोन दिवसांपासून पालकांची लगबग सुरू आहे. तेथे निकाल मिळण्यास फारच विलंब होत असल्याने विद्यार्थी व पालक अस्वस्थ झाले असून गोंधळात पडले आहेत. निकाल जाहीर झाला असला तरीही शिक्षण विभागाने गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे यादीतील प्रथम क्रमांक कोणाचा याची उत्सुकता कायम आहे. गतवर्षी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर नापास झालेल्या काही विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी अर्ज केले होते. त्यामध्ये राज्यातील गुणवत्ता यादीत चमकलेले विद्यार्थी होते. या मोठ्या चुकांमुळे तपासणी पद्धतीबाबत साशंकता निर्माण झाली होती. पालकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मागील वर्षीच्या चुका लक्षात घेता यंदा शिक्षण परिषदेने निकाल वेबसाईटवर जाहीर केला; मात्र गुणवत्ता यादी अद्याप जाहीर केलेली नाही. (प्रतिनिधी)
शिष्यवृत्तीची गुणवत्ता यादी गुणपडताळणीनंतर
By admin | Updated: June 15, 2014 23:16 IST