झिका हा विषाणू फलॅव्हीव्हायरस या प्रजातीमधला असून हा एडीस डासांमार्फत पसरतो. राष्ट्रीय रोगनिदान संस्था नवी दिल्ली व राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथे येथे या आजाराचे निदानाची मोफत सुविधा आहे. डेंग्यूप्रमाणेच या आजाराच्या संशयित रुग्णांचे रक्त/ रक्तजल हे २ ते ८ अंश तापमानात शीतशृंखला अबाधित ठेवून तपासणीला पाठवावे लागतात.
केरळमध्ये या आजाराच्या १३ रुग्णांची नोंद झाल्यानंतर राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. डेंग्यूप्रमाणेच या आजाराची लक्षणे आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात घरालगत स्वच्छता ठेवण्याचे व कुठेही पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. डासांची उत्पत्ती होत असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
या आजाराच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेसह, ग्रामीण भागात ताप रुग्ण सर्व्हेक्षण करणे महत्त्वाचे आहे व या सर्वेक्षणात गरोदर मातांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, डेंग्यू, चिकुनगुनिया आजारासाठी जी पद्धत वापरली जाते, तीच पद्धत या आजाराचे सर्वेक्षणासाठी वापरावी, असे राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी अधीनस्त आरोग्य यंत्रणेला स्पष्ट केले आहे.
यामध्ये नियमित सर्वेक्षणात दर हजार लोकसंख्येत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या गावात जलद ताप सर्वेक्षण करून रुग्णांना योग्य तो औषधोपचार द्यावा व संशयित असलेल्यापैकी पाच टक्के रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीकरिता पुणे एनआयव्हीला पाठविण्याचे निर्देश आहेत.
बॉक्स
‘झिका’ कशामुळे होतो?
झिका हा विषाणू फलॅव्हीव्हायरस या प्रजातीमधला असून हा एडीस डासांमार्फत पसरतो. याच डासांपासून डेंग्यू, चिकुनगुनिया या आजाराचा प्रसार होतो. झिका आजारावर कोणतेच विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे लक्षणानुसार उपचार केले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
ही आहेत लक्षणे
* या आजाराचा अधिशयन कालावधी निश्चित नाही.
* लक्षणे सर्वसाधारण डेंग्यू आजाराप्रमाणे आहेत.
* आजारामुळे रुग्णाला ताप येतो व अंगावर रॅश उमटतात.
* डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा व डोकेदुखी
* सौम्य स्वरूपाची क्षणे दिसतात, ती २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात.
बॉक्स
या आहेत उपाययोजना
या आजारावर विशिष्ट अौषध किंवा लस उपलब्ध नाही, रुग्णांच्या लक्षणांवरून उपचार केला जातो. यामध्ये रुग्णांनी पुरेशी विश्रांती घ्यावी. निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करावे. घराच्या परिसरात डासांचा पैदास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आवश्यक ती फवारणी करावी. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. झोपताना मच्छरदानीचा वापर करावा.
कोट
एडीस या डासापासून होणारा झिका आजार आहे. किंबहुना डेंग्यू, चिकुनगुनिया होण्याची शक्यता आहे. अद्याप आपल्याकडे या आजाराच्या रुग्णाची नोंद नाही. अनुषंगिक धुवारणी, फवारणी सुरू आहे.
डॉ. विशाळ काळे
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका