अन्नत्याग आंदोलन स्थगित : आदिवासी विकास परिषदेचा पुढाकारअमरावती : मेळघाटातील धारणी, चिखलदरा तालुक्यात दऱ्या, खोऱ्यात, डोंगराळ भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींना पायाभूत सुविधा त्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मंगळवारी राज्यपालाचे सचिव परिमल सिंह यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यावतीने घेराव घालण्यात आला. चुन्नीलाल धांडे यांच्या नेतृत्वात आदिवासींनी विश्रामभवनात राज्यपालांचे सचिवांची भेट घेऊन कैफियत मांडली.धारणी येथील उपविभागीय कार्यालयासमोर आदिवासींनी विविध मागण्यांसाठी सोमवारी अन्नत्याग आंदोलन केले होते. मागण्यांमध्ये प्रामुख्याने पेसा कायद्यातंर्गत मेळघाटात शासक ीय आश्रमशाळांमध्ये कोरकु भाषा अवगत शिक्षकांची नियुक्ती करणे, इंग्रजी माध्यमांचा शाळा सुरु करणे, शासकीय आश्रमशाळांमध्ये पुरवठा कंत्राट आदिवासी महिला बचत गटांना देण्यात यावे, श्रावणबाळ योजनेचे अनुदान, वनकर्मचाऱ्यांकडून होणारी मारहाण रोखणे, कंत्राटात आदिवासींना प्राधान्य देण्यात यावे,धारणी उपजिल्हा रुग्णालयात विविध रिक्त पदे भरती करुन आरोग्य सेवा पुरविण्यात याव्यात, आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यात याव्यात आदी मागण्यांचा समावेश होता. उशिरा रात्री ८.३० वाजेपासून अन्नत्याग आंदोलन सुरु असताना प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शणमृग राजन यांनी काही मागण्या मंजूर केल्यात. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. परंतु प्रमुख मागण्या कायम असल्याचे आंदोलनकर्त्यांच्या मंगळवारी लक्षात आले. त्यामुळे मंगळवारी आदिवासींचा मोर्चा पुन्हा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दिशेने वळला. मात्र उपविभागीय अधिकारी हे दौऱ्यावर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या आंदोलनात चुन्नीलाल धांडे, सज्जुलाल बेठेकर, परेमलाल भिवरेकर, बिबीबाई पटेल, शांताबाई पटेल, प्रमिला जावरकर, सलिताबाई आदी सहभागी झालीे होते. (प्रतिनिधी)सचिवांची सकारात्मक भूमिकाराज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे सचिव परिमल सिंह हे मंगळवारी मेळघाटच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे आंदोलनकर्त्या आदिवासी बांधवांनी धारणी येथील विश्रामभवनात परिमल सिंह यांची भेट घेऊन विविध मागण्या त्यांच्या पुढ्यात ठेवल्यात. आदिवासींच्या मागण्या रास्त असल्याचे त्यांनी सांगून त्या लवकरच सोडविल्या जातील, असे आश्वासन आदिवासी समाजाचे नेते चुन्नीलाल धांडे यांना दिले.
राज्यपालांच्या सचिवांना आदिवासींचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 00:07 IST