अमरावती : राज्याच्या तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्यावतीने शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ या वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश मान्यता प्रक्रिया २२ फेब्रुवारीपासून अमरावती विभागात आरंभली आहे. मात्र, अमरावती विभागात कोरोनाचा प्रकोप बघता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश मान्यता प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी शिक्षण मंचने केली आहे.
येथील तंत्र शिक्षण सहसंचालकांना शिक्षण मंचचे अध्यक्ष प्रदीप खेडकर यांनी पत्राद्धारे अमरावती विभागातील कोरोना संक्रमित रुग्णांबाबतची वस्तुस्थिती विशद केली आहे. अभियांत्रिकी प्रथम आणि थेट द्धितीय, वास्तूशास्त्र पदवी, पदव्युत्तर पदवी, एम.बी..ए, व एमसीएच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची गुणवत्ता याद्यांची तपासणी करण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाने तपसाणी अधिकारी नियुक्त केले आहे. २२ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश मान्यता प्रक्रिया राबविण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. गुणवत्ता यादी तपासताना उमेदवारांबाबत काही त्रुटी आढळल्यास त्या पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे, मात्र, गत १५ दिवसांपासून अमरावती विभागात कोरोना संक्रमित रूग्णांची आढळून येणारी संख्या चिंताजनक आहे. अमरावती जिल्ह्यात गुरुवारी ९०६ पॉझिटिव्ह आढळून आले असून, सहा रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३२ हजार ८३१ कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, ४८७ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे गर्दी करता येणार नाही. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश मान्यता प्रक्रिया पुढे ढकलून विद्यार्थ्यांना तूर्तास दिलासा द्यावा, अशी मागणी प्रदीप खेडकर यांनी केली आहे.