परतवाडा : महाराष्ट्र शासनाचे सन २०१९-२० राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पुरस्कार नुकतेच ग्रामविकास विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आले. अचलपूर तालुक्यातील परसापूर येथील ग्रामविकास अधिकारी विनोद पंजाबराव तट्टे यांना राज्य शासनाचा हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ते परसापूर व धामणगाव गढी ग्रामपंचायतींच्या सेवेत असून, जिल्हा ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत.
स्वच्छता अभियान, यशवंत पंचायतराज अभियान, निर्मल ग्राम योजना, वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन, शिक्षण व आरोग्य जनजागृती यांसह नानाविध नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामपातळीवर विनोद तट्टे यांनी विकासाभिमुख कामे केली आहेत. त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीला जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार ५० लक्ष रुपये, स्वच्छता अभियान पुरस्कार तीन लक्ष रुपये, केंद्र सरकार पुरस्कृत पंडित दीनदयाळ उपाध्याय सशक्तीकरण पुरस्कार १० लक्ष रुपये असे जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर बहुमान मिळाले आहेत.
-------------