अमरावती : लॉकडाऊन असतानाही शहरात विनाकारण फिरताना आढळून आल्याप्रकरणी शुक्रवारी नाकाबंदी व फिक्स पाॅईंटवर ४६५ वाहनांवर कारवाई करून वाहनचालकांना ८५ हजार १०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी दिली.
मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्या तसेच कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी २४, तर इतर २७ अशा एकूण ५१ जणांविरुद्ध भादंविचे कलम १८८ व इतर कलमान्वये शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला. लॉकडाऊन असतानाही काहीही कारण नसताना नागरिक शहरात फिरत आहेत. त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाईंचा बडगा उगारण्यात येत आहे तसेच दोषी आढळल्यास थेट गुन्हा नोंदविला जात आहे. शहरात फिक्स पाॅईंटवर प्रत्येक वाहनाची कसून चौकशी सुरू आहे. कारवाई करण्यासाठी पोलिसांची १० विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. ७ फेब्रुवारीपासून आतापर्यंत मास्क न लावण्याबाबत ४३०, सामाजिक अंतर न पाळण्याबाबत २१, लॉकडाऊनमध्ये पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्याबाबत ११ व इतर ४५ अशा एकूण ५०५ जणांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.