अमरावती : आगामी विधानसभेच्या निवडणुका शिवसेना भाजप व मित्र पक्षांसह महायुती एकत्र लढविणार आहे. मात्र, जुन्या फॉर्मुल्यानुसारच ही निवडणूक लढविली जाईल. ज्या मतदार संघावर पूर्वीपासून शिवसेनेचा दावा आहे, तो मतदारसंघ शिवसेना सोडणार नाही. प्रामुख्याने जिल्ह्यातील अचलपूर आणि तिवसा मतदार संघाचा समावेश असल्याचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेना-भाजप महायुती अभेद्य असून कुठल्याही परिस्थितीत महायुती सोबतच निवडणूक लढविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, २४ तास वीज पुरवठा, बेरोजगारांना काम अशामहत्वाच्या मुद्यांवर आगामी निवडणूक लढविली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केली असून त्याचा एक भाग म्हणून ‘गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक’ ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवली जाणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. मात्र, जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान अदला-बदल होऊ शकते असेही कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. रामदास कदम अमरावती जिल्ह्यातील पक्षाच्या संघटनात्मक बाबींची बांधणी तसेच शिवसेनेच्या वाट्यावर असलेल्या मोर्शी-वरूड, तिवसा, अचलपूर, दर्यापूर व बडनेरा या मतदार संघांसह अन्य मतदार संघातही शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी त्यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष चर्चा करून मते जाणून घेतली. यासाठी प्रत्येक मतदार संघात मेळावे घेण्यात आले.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेस सरकारचे दिवस भरले असून या सरकार ने घोटाळे करून सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडले आहे. निवडणुकीत शिवसेनेचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसैनिक जोमाने कामाला लागले आहेत. दरम्यान कदम यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्कासित नेते संजय खोडके यांना शिवसेना उमेदवारी देईल का? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, याबाबतचा सर्वस्वी निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील. आदिवासी, शेतकरी, बेरोजगारांना न्याय देण्यास महायुती कटिबध्द असल्याचे कदम यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार अनंत गुढे, आमदार अभिजीत अडसूळ, जिल्हाप्रमुख संजय बंड, बाळासाहेब हिंगणीकर, प्रशांत वानखडे महानगर प्रमुख दिगंबर डहाके, नाना नागमोते, दिनेश वानखडे, प्रदीप वडनेरे, अमोल निस्ताने आदींची उपस्थिती होती.
अचलपूर, तिवसा मतदारसंघ शिवसेनेकडेच कायम
By admin | Updated: July 22, 2014 23:46 IST