परतवाडा : सरळ सेवा नोकरभरतीत वादग्रस्त ठरलेल्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन बांधकाम केलेल्या दुकान गाळ्याच्या अमानत रकमेत आठ लाख रुपयांचा अपहार निलंबित सहायक सचिव मंगेश भेटाळूने केला असल्याच्या तक्रारीवर आवश्यक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी मंगळवारी बाजार समितीला दिल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे गतवर्षी नवीन दुकान गाळ्याचे अचलपूर मार्गांवर बांधकाम करण्यात आले. लिलाव पद्धतीने हे दुकान गाळे देण्यात आले. यासाठी आवश्यक अमानत रक्कम गाळेधारकांनी बाजार समितीला जमा केली. त्यामध्ये निलंबित सहायक सचिव मंगेश भेटाळू याने आठ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार तहसीलदार जिल्हा उपनिबंधक ठाणेदार अचलपूर यांना करण्यात आली. कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. ५ मेपासून उपोषण सुरू होणार असल्याने त्याची दखल अचलपूर तहसीलदारांनी घेतली. कोरोना नियम पाहता जिल्हा उपनिबंधकांना यासंदर्भात पत्र पाठविले. जिल्हा उपनिबंधकांनी मंगळवारी अमानत रक्कममध्ये झालेल्या अपहाराची दखल घेत तक्रारीनुसार निलंबित सहायक सचिव मंगेश भेटाळू बाजार समिती अधीनस्त कर्मचारी असल्याने सदर तक्रारीवर आवश्यक कारवाई करण्यात यावी व तशी कारवाई केल्याचा अहवाल सादर करण्याचे पत्र दिले आहे.
बॉक्स
मोठा घोळ झाल्याची चर्चा अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती नोकर भरतीपासून चर्चेत आली आहे. नवीन दुकान गाळे संबंधित कंत्राटदाराला दिलेले बांधकाम, लिलाव, अनामत रक्कम, असा बराच मोठा घोळ असल्याची चर्चा आहे. हा सर्व प्रकार चौकशीअंती सर्व बाहेर येणार आहे.
कोट
सदर प्रकरणात निलंबित सहायक सचिव मंगेश भेटाळू यांची पूर्वीच खातेनिहाय चौकशी सुरू आहे. चौकशी अहवालाअंती बाजार समिती आवश्यक ती कारवाई करेल.
-पवन सार्वे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, अचलपूर