अचलपूर : येथील हिरापुरा येथील नागराज मंदिर परिसराची साफसफाई करताना दोन समुदायातील काही जणांमध्ये वाद उफाळून आला. यात एक जण जखमी झाला असून पोलिसांनी तिघांना अटक केली. शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.हिरापुरा येथील राजेंद्र नानाजी तायडे (३८), असे जखमीचे नाव असून याप्रकरणात दोन्ही गटातील राजेंद्र तायडे, मोहन भंडारी व दुसऱ्या गटातील मो. अफसर शे. रुस्तम या तिघांना अटक करण्यात आली आहे.यासंदर्भात राजेंद्र तायडे यांनी दिलेल्या पोलीस तक्रारीनुसार, हिरापुरा परिसरात नागराज मंदिर आहे. मंदिराच्या परिसरातील झुडपी काढण्यासाठी व जमिन सपाट करण्यासाठी त्यांनी जेसीबी आणलेला होता. ते जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई करीत असताना विशिष्ट समुदायातील १० ते १५ जण आले व त्यांनी राजेंद्रला विचारणा केली. यावरुन वाद झाला व काठ्या आणि सेंट्रीगच्या राप्टरने हल्ला चढवून जखमी केले. यात त्याच्या खांद्याला व हाताला दुखापत झाली. याप्रकरणी पोलिसांनी भादंविच्या ३२४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तर दुसऱ्या गटातील सै. वसीम सै. हमीद यांच्या तक्रारीनुसार, आपल्या एसटीडी समोर जेसीबीच्या सहायाने खोदकाम केले जात होते. याबाबत विचारणा केली असता राजेंद्र तायडे व माधव भंडारी या दोघांनी आपल्याला जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी अचलपूर पोलिसांनी भादंविच्या २९४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अचलपुरात नागराज मंदिराचा वाद उफाळला
By admin | Updated: December 6, 2014 22:39 IST