फोटो पी ०४ बोरनदी
टाकरखेडा संभू : अमरावती ते बोराळा मार्गावरील बोर नदीवरील पुलावरून अमरावतीकडे येणारा मिनीडोर नदीत कोसळून चालक गंभीर झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. या पुलावर यापूर्वीदेखील अनेक अपघात झाले असून, अनेकांचे बळी गेले आहेत. याबाबतची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली होती. परंतु, अद्यापही कार्यवाही न झाल्याने या पुलावर मंगळवारी अपघाताची पुनरावृत्ती झाली.
अमरावती ते चांदूर बाजार-बोराळा-शिराळा मार्गावर रस्त्याचे रुंदीकरणासह बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्याने वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्ता रुंद व डांबरीकरण झाल्याने या रस्त्यावरील वाहनांची गतीदेखील वाढली आहे. परंतु, या मार्गातील नदीचा पूल आवागमन करणाऱ्या वाहनांकरिता अडथळा ठरत आहे. दोन वर्षांपूर्वी बोर व पेढी नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यात आले असून, तेथून नागमोडी मार्ग काढण्यात आले आहेत. त्यामुळे दोन वर्षांत याच पुलांवर अपघाताच्या अनेक घटना घडल्या. कित्येक अपघातात जीवितहानी झाली. डिसेंबर २०२० मध्ये बोर नदीच्या पुलावर संत्र्याचा ट्रक उलटला होता. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी याच पुलावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता.
अद्यापही पुलावर सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने मंगळवारी दुपारी १२ वाजता शिराळा येथून अमरावतीकडे येणारा मिनीडोर गतिरोधकावरून थेट बोर नदीत कोसळला. चालक वाहनाखाली दबून गंभीर जखमी झाला. याची माहिती तात्काळ वलगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.