सोयाबीनचे अनुदान : बाजार समिती संचालकाची पालकमंत्र्यांकडे मागणीअमरावती : बाजार समिती हमीपेक्षा कमी भावाने विक्री झालेल्या सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीतील सोयाबीनला प्रती क्विंटल २०० रुपये व २५ क्विंटल अनुदान शासन देणार आहे. मात्र यामधील त्रुटीसाठी १०० रुपयांचे मुद्रांकावरील शपथपत्र मागण्यात येते. त्याऐवजी सातबाराधारकाचा कागदावरील अर्ज ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी अमरावती बाजार समितीचे संचालक प्रफुल्ल राऊत यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. सोयाबीनचे अनुदानासाठी बाजार समितीकडून ३१ जानेवारीपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहे. मात्र हे प्रस्ताव सादर करताना ज्या नावाचा सातबारा त्याच नावाची अडतपट्टी अनिवार्य करण्यात आलेली आहे. बाजार समित्यांकडे येणाऱ्या प्रस्तावापैकी २५ ते ३० टक्के प्रस्तावात या अटीचा अडसर आहे. या प्रकरणात सातबाराचा उतारा आई-वडिलांच्या नावे व अडतपट्टी मात्र मुलाच्या नावे आहे. यासाठी तहसीलदार कार्यालयातील शपथपत्र बाजार समितीने मागविले आहे. यासाठी शेतकऱ्यांना १५० ते २०० रुपये खर्च येऊन संपूर्ण दिवस वाया जात आहे. या प्रस्तावासाठी चालू वर्षाचा अद्ययावत सात-बारा तलाठ्यांच्या स्वाक्षरीसह मागविण्यात येत आहे. बरेचवेळा तलाठी मुख्यालयी किंवा तलाठी कार्यालयात उपलब्ध राहत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनावश्यक हेलपाटे मारावे लागत आहे. यासाठी विभागातील तलाठ्यांना कार्यालयात राहण्याचे आदेश द्यावेत व रक्ताच्या नातेवाईकांच्याप्रकरणात जर सात-बाऱ्यावरील नाव व अडत पट्टीवरचे नाव वेगवेगळे असतील तर शेतकऱ्यांनी साध्या कागदावरच साधा केलेला अर्ज ग्राह्य धरण्याची मागणी अमरावती बाजार समितीचे संचालक प्रफुल्ल राऊत यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)प्रस्तावासाठी फेब्रुवारी अखेर मुदतवाढ हवी बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी सादर करावयाच्या प्रस्तावासाठी शासनाने ३१ जानेवारी २०१७ ही अंतिम मुदत दिली आहे. मात्र प्रस्ताव सादर करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी पाहता सादर करणाऱ्या प्रस्तावासाठी असणारी मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात यावी, अशी मागणीदेखील राऊत यांनी केली आहे.सात-बारा हा निकष धरावा ग्राह्य सोयाबीनचे अनुदान मिळण्यासाठी बाजार समितीने त्यांच्या यार्डात सोयाबीनची विक्री केल्याची अडतपट्टी व त्याच नावाचा सात-बारा व बँक खात्याची झेरॉक्स मागविली आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन आप्त व स्वकीयांनी विकले आहेत ते मात्र या अनुदानापासून वंचित होण्याची शक्यता आहे. शासनाने अटी व शर्थी न ठेवता ७/१२वरील सोयाबीन पिकांच्या नोंदीद्वारे विहित मर्यादेत अनुदान द्यावे, अशी मागणी आहे.बाजार समितीत ‘एफसीआय’द्वारे तूर खरेदी अमरावती बाजार समितीच्या यार्डात एफसीआयमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू आहे. बोनससह ५०५० रुपये प्रतिक्विंटल भावाने तूर खरेदी केली जाणार आहे. या हंगामातील तूर विक्रीस आणावी व यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण १२ टक्क््यांपर्यंत असावे. शेतकऱ्यांनी सोबत ७/१२, आधार कार्ड व पासबुकाची झेरॉक्स सोबत आणावी, विक्री झालेल्या मालाचे दोन, तीन दिवसांत पेमेंट मिळणार असल्याचे बाजार समितीने कळविले.
शपथपत्राऐवजी अर्ज धरावा ग्राह्य
By admin | Updated: January 24, 2017 00:20 IST