अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची ९, १० व ११ ऑगस्ट असे तीन दिवस राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद (नॅक) चमूकडून पाहणी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठात जोरदार तयारी सुरू असून, इमारतींची रंगरंगोटी वेगाने करण्यात येत आहे. यापूर्वी अर्थसंकल्पात ‘नॅक’ मू्ल्यांकनासाठी एक कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
डिसेंबर २०२० मध्ये होणारे ‘नॅक’ मू्ल्यांकन तब्बल सात महिन्यांच्या विलंबाने होत आहे. केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘नॅक’ चमूकडून मू्ल्यांकनाच्या पाहणीसाठी तारीख निश्चित केली आहे. चमूची तारीख कळताच विद्यापीठ प्रशासनाने तयारीला वेग आणला आहे. महत्त्वाच्या इमारतींना युद्धस्तरावर रंगरंगोटी करण्यात येत आहे. मुख्य प्रशासकीय इमारतींना नवरीचा साज चढविला जाणार आहे. यानुसार नियोजन आरंभले आहे.‘नॅक’ चमूत अंदाजे ७ ते ८ सदस्य असतील. अद्यापपर्यंत या चमू काेण येणार, याची यादी विद्यापीठाला मिळाली नाही. ‘नॅक’मू्ल्यांकनाच्या अनुषंगाने विभागनिहाय तयारी आणि लागणाऱ्या साहित्य, वस्तूची यादी तयार करण्यात येत आहे. रविवारी सुटीचा दिवस असताना मुख्य अधिकारी विद्यापीठात तैनात असल्याचे दिसून आले. झाडांची रंगरंगोटी, हिरवळमय परिसर आणि साफसफाईला सुद्धा वेग आला आहे. एकूणच विद्यापीठाचा परिसर ‘नॅक’ मू्ल्यांकनासाठी झळाळून निघणार आहे.
-----------------
‘नॅक’साठी तयारीला वेग आला आहे. चमू येण्यासाठी १४ दिवस शिल्लक आहेत. प्रत्येक विभागाची गरज लक्षात घेता तसे वस्तू, साहित्य पुरविले जातील. कोणत्याही उणिवा असू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ