मुद्दा सावकारीचा : ६२० शेतकरी कर्जमाफीपासून वंचितअमरावती : सावकारीच्या व्यवसायात जिल्हाभर व्यापक जाळे पसरविलेल्या येथील कुबडे ज्वेलर्स या प्रतिष्ठानाचे प्रमुख महादेव नामदेव कुबडे यांच्याविरुद्ध सहकारी संस्थांचे उपनिबंधक राजेंद्र पालेकर यांच्या तक्रारीवरुन शहर कोतवाली पोलिसांनी गुरुवारी गुन्हे दाखल केले. अपहार करणे, थकवणूक करणे, कर्ज उपलब्धीवर प्रतिबंध घालणे, रोखीचे नुकसान करणे तसेच विहित नमुन्यानुसार रोकड वही व खातेवही न ठेवणे, कर्जदारांच्या रकमेच्या हिशेबाचे सुवाच्य विवरणपत्र सादर न करणे, असे दाखल झालेल्या गुन्ह्यांचे स्वरुप आहे. भादंविच्या कलम ४०६, ४१८, ४२२, ४२७ आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम ४३ अन्वये हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. काय आहे प्रकरण ?विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने १० एप्रिल २०१५ रोजी शासन निर्णय जारी करुन कर्जमाफीचे निकष ठरवून दिले होते. शेतकऱ्यांवर नाहक संकटअमरावती : त्याअन्वये १७१.३० कोटींचे कर्ज शासनामार्फत संबंधित सावकारास अदा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास मान्यता देण्यात आली होती. या निर्णयानुसार परवानाधारक सावकाराने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या व व्याजाच्या तपशिलासह सहकारी संस्थांच्या तालुका उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक यांच्याकडे प्रस्ताव सादर करणे बंधनकारक होते. त्यासाठी ३१ मार्च २०१६ ही अंतिम तिथी होती. गांधी चौक स्थिती कुबडे ज्वेलर्स या प्रतिष्ठानाचे परवानाधारक सावकार महादेव कुबडे हे आहेत. शासनाने मागितलेली माहिती ठराविक कालावधीत सादर करणे ही त्यांची कायदेशीर जबाबदारी होती. तथापि त्यांनी ती पार पाडण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे जिल्ह्यातील ६२० शेतकऱ्यांवर कर्जमाफीपासून वंचित राहण्याचे संकट ओढवले. कर्जाने आणि व्याजाने पिचलेल्या शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मोकळा श्वास घेता यावा, यासाठी शासन सज्ज असूनही केवळ कुबडे ज्वेलर्समुळे हक्काची अंमलबजावणी शेतकऱ्यांना करता आली नाही, या गंभीर कारणास्तव उपनिबंधकांनी कुबडे यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार नोंदविली. ही तक्रार अमरावती तालुक्यांतर्गत येत असल्याने कुबडे यांच्याविरुद्ध फौजदारी नोंदविण्यात आली. अन्य तालुका स्तरावरही असे गुन्हे दाखल होण्याची शक्यता सहकारी संस्थांमधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.काय म्हणतो सावकारी अधिनियम ?बेकायदेशीर सावकारीचे समूळ उच्चाटन आणि बेकायदा सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने ‘महाराष्ट्र सावकारी अध्यादेश २०१४’ हा सुधारित कायदा राज्यभरात लागू केला. परवानाधारक सावकाराने सर्व आवश्यक अभिलेख न ठेवल्यास व या तरतूदींचे पालन न केल्यास २५ हजार रुपये दंडाची तरतूद यात आहे. परवानाधारक सावकाराने कर्जदारांच्या हिशेबांच्या नोंदी विहित नमुन्यांनुसार ठेवणे आणि उपनिबंधकांना सादर करणे या अधिनियमनानुसार बंधनकारक ठरते.वारंवार सूचना, तरीही उल्लंघनगांधी चौक स्थित कुबडे ज्वेलर्स हे परवानाधारक सावकार असून ते नागरिकांजवळील सोने गहाण ठेवून त्यांना व्याजाने कर्ज देतात. शासनाच्या सावकारी कर्जमाफी धोरणाच्या अमंलबजावणीचे काम सहकारी संस्थेचे उपनिबंधक करीत आहेत. उपनिबंधक राजेंद्र पालेकर यांनी ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंतची थकीत कर्जधारकांची यादी आरोपी महादेव कुबडे यांना मागितली होती. त्यासंदर्भात उपनिबंधकांनी महादेव कुबडे यांना वारंवार स्मरणपत्र व सूचना देण्यात आल्या होत्या, हे येथे उल्लेखनीय. जुने व नवीन अशी एकूण ६२० जणांच्या नावांची यादी उपनिबंधक कार्यालयास देण्यात आली होती. मात्र, नजरचुकीने किंवा काहींचा पत्ता बदलल्याने ती नावे सुटली असावीत. सुटलेल्या नावांची जबाबदारी आमची राहील, असे प्रशासनाला कळविले होते. अचानक उपनिबंधकांकडून एफआरआर नोंदविला गेला. - समीर महादेव कुबडे, कुबडे ज्वेलर्स
कुबडे ज्वेलर्सविरुद्ध अपहाराचा गुन्हा
By admin | Updated: January 14, 2017 00:04 IST