अमरावती : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या अनुषंगाने मालमत्तेचे ‘आॅन दी स्पॉट’ करनिर्धारण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार झोन क्र. १ अंतर्गत मागील दोन दिवसांत ५०० घरांची तपासणी करण्यात आली असून ४५ मालमत्तांचे करनिर्धारण करण्यात आले आहे. नव्या करनिर्धारणामुळे २५ लाखांचे उत्पन्न तिजोरीत जमा होईल.आयुक्त अरुण डोंगरे यांनी उत्पन्न वाढीसाठी विविध उपायोजना करण्याचे आदेश पारित करताच पाचही झोनचे सहायक आयुक्त वेगाने कामाला लागले आहेत. थकित मालमत्ता कर वसूल करण्याची मोहीम सुरु केली असताना अधिक रक्कम महापालिका तिजोरीत कशी जमा होईल, याचे नियोजन सहायक आयुक्तांनी चालविले आहे. दरम्यान, २२ व २३ सप्टेंबर रोजी झोन क्र. १ चे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी गाडगेनगर परिसरात अतिरिक्त बांधकाम, भाडेकरुंची शोधमोहीम चालविली. या दोन दिवसांत सुमो ५०० घरांची तपासणी करण्यात आली. महापालिका सोई-सुविधा पुरवित अनेक घरमालकांनी परस्पर बांधकाम करुन ती भाड्याने देत व्यवसाय करण्याला प्रारंभ केला आहे. मात्र, महापालिका दप्तरी ही मालमत्ता जुन्याच पध्दतीने कर आकारणी करीत आहेत. त्यामुळे अशा घरांची शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. मालमत्तेचे ‘आॅन दी स्पॉट’ करनिर्धारण हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या मोहिमेत बांधकामाचे स्वरुप, अतिरिक्त बांधकाम, मंजूर बांधकाम आदी बाबी तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रारंभी मंजूर केलेले बांधकाम, त्यानंतर उभारलेले अतिरिक्त बांधकाम याची तपासणी सुरु करण्यात आली आहे. ‘आॅन दी स्पॉट’ मालमत्ता कर निर्धारणात अतिरिक्त बांधकाम किंवा भाडेकरु आढळल्यास अशा घर मालकांना करनिर्धाणाची नोटीस बजावली जात आहे. मागील दोन दिवसांत ५०० घरांची तपासणीनंतर ४५ घरांना करनिर्धारण करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. नव्या करनिर्धारणानुसार कर आकारणी झाली तर महापालिका तिजारीत कायमस्वरुपी २५ लाखांचे उत्पन्न वाढणार आहे. ही मोहीम घरमालकांना पूर्व सूचना न देता राबविली जात असल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली.
मालमत्तेचे ‘आॅन दी स्पॉट’ करनिर्धारण
By admin | Updated: September 25, 2014 23:16 IST