'गॉड फादर' कोण ? : ९४ लाखांचे ‘स्मार्ट’ गौडबंगालंअमरावती : केंद्र शासनपुरस्कृत स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या टप्यासाठी २२६८ कोटी रुपयांचा फेरप्रस्ताव बनविणारी आलिया कन्स्लटंसी महापालिकेसाठी बिनबुलाये मेहमान ठरली आहे. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आलियाच्या नावावर नकाराची फुली मारल्यानंतर फेरप्रस्तावासाठी आलियाशी कुठलाही संपर्क साधला नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे या ९४ लाखांच्या स्मार्ट खेळीमागे कोण , असा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.शनिवारी महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी पत्रपरिषद घेऊन आलिया कन्स्लटंसीने स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी फेरप्रस्ताव बनविल्याची माहिती दिली. मात्र, आलिया एजन्सीला फेरप्र्रस्तावासाठी महापालिकेने संपर्क साधला नसल्याची माहिती उघड झाली आहे. तसा दावाच प्रशासनाने केला आहे. स्मार्ट सिटी अभियानाच्या पहिल्या टप्यात निवड हुकल्याने तत्कालीन आयुक्त गुडेवार यांनी आलिया कन्स्लटंसीवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत फेरप्रस्तावासाठी आॅस्ट्रेलियन सुनील देशमुख यांच्या कंपनीचे नाव सुचविले. त्यावर स्थायी समितीने शिक्कामोर्तबही केले. मात्र, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पॅनलमध्ये असलेल्या एजन्सीची फेरप्रस्तावासाठी निवड करावी, अशा सूचना महापालिकेला प्राप्त झाल्यात. त्यानुसार वॉल्टर डी मुर आणि स्मार्टटेक सोलुशन या दोन एजन्सीशी एमओयू करण्यात आले. त्यामुळे आलियाशी असलेला करार आपोआप रद्दबातल ठरला. दरम्यान चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाली आणि आलिया चोरपावलाने महापालिकेत परतली. उर्वरित ८५ लाख रुपये मोबदला मिळून देण्याच्या आश्वासनावर आलियाने २२६८ कोटी रुपयांचा फेरप्रस्ताव बनविला, अशी माहिती समोर येत आहे. आलियाने स्मार्ट सिटीचा फेरप्रस्ताव केला असेल तर गुडेवार यांनी एमओयु केलेल्या त्या दोन कंपन्यांनी नेमके काय केले. याचे समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून मिळालेले नाही. या संपुर्ण प्रकरणात आर्थिक सावळा गोंधळ झाल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. आलियाशी झालेला करार रद्द करण्यात आला नव्हता, त्यामुळे आलियानेच फेरप्रस्ताव बनविला. मात्र, त्यासाठी महापालिकेने आलिया कंपनीशी कुठलाही संपर्क साधला नाही, असा दावा महापालिकेतील संगणक कक्षप्रमुख डेंगरे यांनी केला. ‘आलिया’चा मागच्या दाराने प्रवेश! चंद्रकांत गुडेवार यांनी स्मार्ट सिटीच्या फेरप्रस्तावासाठी आलियाला पसंती दिली नाही. दरम्यान सुनील देशमुख यांच्या कंपनीवर गुडेवार यांच्यासह स्थायी समितीनेही शिक्कामोर्तब केले. मग, देशमुख यांच्या कंपनीवर शिक्कामोर्तब होत असताना स्थायी समितीने डोळे बंद करून तो प्रस्ताव पारीत केला काय ,असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आलियाशी झालेला करार रद्दच झालेला नव्हता तर स्थायी समिती व प्रशासनाने प्रथम सुनील देशमुख व त्यांनतर अन्य दोन कंपन्यांच्या नावावर कसे शिक्कामोर्तब केले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकंदरीतच १० लाख रुपये अग्रिम घेऊन ५ हजार ५०० रुपये कोटींचा प्रस्ताव साकारणाऱ्या आलियाला उर्वरित ८४ लाख रुपये काढून देण्यासाठी मागील दाराने प्रवेश दिल्याचे बोलले जात आहे. याबाबत स्थायी समिती सभापतींनी अनभिज्ञता दर्शविली आहे. आलिया कन्स्लटंसीशी केलेला करार रद्द केलेला नव्हता. तत्त्पूर्वी सुनील देशमुखांच्या प्रस्तावालाही हिरवी झेंडी देण्यात आली होती.फेरप्रस्ताव बनविण्यासाठी आलियाशी कुठलाही संपर्क साधला नाही. - अमित डेंगरे, सिस्टीम मॅनेजरयासंदर्भात प्रशासनालाच विचारणा करावी. मी केवळ सादरीकरण केले. आलीया कन्सल्टंशीचे एमडी विदेशात आहेत. स्मार्ट सिटीच्या फेर प्रस्तावाबाबत त्यांच्याशीच बोलणे योग्य ठरेल.-सुशील पाठक, आलिया कन्सल्टंसी
‘आलिया’ बिनबुलाये मेहमान!
By admin | Updated: June 28, 2016 00:06 IST