लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील हनुमाननगर येथील ९४ वर्षे वयाच्या आजोबांनी रविवारी कोरोनावर मात केली. कोविड रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी संक्रमणाशी कणखरपणे लढा दिला आणि ठणठणीत बरे झाल्यानंतर स्वत: चालत रुग्णालयाबाहेर आले.हनुमाननगर येथील रहिवासी असलेले वयोवृद्ध गृहस्थ कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न आल्यानंतर त्यांना तात्काळ येथील कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. दहा दिवसांच्या उपचारानंतर बरे होऊन ते स्वत:च्या घरी परतले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, कोविड रुग्णालयातील डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी या सर्वांनी त्यांच्या निरोपाच्या वेळी हजेरी लावली. टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले व त्यांना दीघार्युष्यासाठी शुभेच्छा दिल्या.उपचाराच्या काळात सदर वयोवृद्ध गृहस्थाने हिंमत कायम ठेवली. कोरोना योग्य उपचारांनी बरा होतो. त्यामुळे घाबरून जाण्यासारखे काहीही नाही. मास्कचा वापर, स्वच्छता व फिजिकल डिस्टन्सिंग या नियमांचे पालन करावे तसेच कुठलीही लक्षणे आढळताच तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावेत, अशी त्रिसूत्री त्यांना डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.कोरोनामुक्तांची संख्या ११०० च्या दारातउपचाराअंती बरे झालेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १०९८ वर पोहोचली आहे. बाधितांच्या तुलनेत ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ होण्याचे प्रमाण ६७ टक्क्यांवर पोहोचले आहे. सद्यस्थितीत लक्षणविरहित, सौम्य व मध्यम स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर चार ते पाच दिवस उपचार केल्यानंतर त्यांना पुढील चार ते पाच दिवस निरीक्षणात ठेवले जाते व कुठलेही लक्षणे नसल्यास त्यांना संक्रमणमुक्त केले जाते. मात्र, पुढील सात दिवस त्यांना गृह विलगीकरणात राहावे लागत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
९४ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात; चालत गेले रुग्णालयाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:01 IST