अमरावती : राज्यातील ८ लाख १६ हजार ३२१ निराधार अपंग, विधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत एप्रिल व मे महिन्याकरिता ९१ कोटी ९१ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या आर्थिक वर्षातील अनुदानाचा पहिला टप्पा जून महिन्यात लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्ध भूमिहीन पेन्शन योजना याअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान मिळते. राज्यात ४०० रुपये प्रतिमाह मानधन मिळणारे ४० हजार ९९४ लाभार्थी आहेत. ६०० रुपये प्रतिमाह मानधन मिळणारे ६ लाख १० हजार ८३९ लाभार्थी आहेत. ७०० रुपये मानधन मिळणारे १ हजार ७८७ व ९०० रुपये प्रतिमाह मानधन मिळणारे १ लाख ६२ हजार ७०१ लाभार्थी आहेत. या एकूण ८ लाख १६ हजार ३२१ लाभार्र्थींना एप्रिल व मे या दोन महिन्याचे एकत्रित मानधन जूनमध्ये मिळणार आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत विधवा व ४० टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणाऱ्या व्यक्तींना ६०० रुपये प्रतिमाह अनुदान मिळते. श्रावण बाळ निराधार अनुदान योजनेंतर्गत ६५ वर्षे पूर्ण झालेल्या, दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन नागरिकांना ६०० रुपये दर महिना अनुदान मिळते. इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजनेंतर्गत ६० वर्षे पूर्ण झालेल्या व पालनपोषण करण्यास कुणीही नाही व ज्यांचे उत्पन्न २० हजारांच्या आत आहे, अशा नागरिकांना ४०० रुपये प्रतिमाह अनुदान मिळत आहे. (प्रतिनिधी)कागदपत्रांची फेरतपासणीसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारा अनुदान देणाऱ्या योजनांचा अनेक बोगस लाभार्थी लाभ घेत असल्याने शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या लाभार्र्थींच्या कागदपत्राची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअन्वये गावपातळीवर तलाठी प्रत्येक लाभार्र्थींची कागदपत्रांसह तपासणी करून अहवाल सादर करणार आहेत. या प्रक्रियेत मोठ्या संख्येत लाभार्थी वगळले जाणार आहेत.
८ लाख निराधारांना ९२ कोटींचे अनुदान
By admin | Updated: May 10, 2015 00:38 IST