अमरावती : अमरावती व दर्यापूर तालुक्यांतील गावठाणातील पुरामुळे भागात नागरी सुविधांसाठी सुमारे ९२.१४ लाखांचा निधी वितरणास महसूल व वन विभागांनी मान्यता दिली आहे. कामाच्या प्रगतीनुसार पुढील टप्प्यांतील निधीही वेळेत उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी येथे दिली.
अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या गावांचे पुनर्वसन, विविध नागरी सुविधांबाबत पालकमंत्र्यांनी अनेक गावांना भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर बैठकांद्वारे आढावाही घेतला. या गावांना वेळेत निधी मिळून कामांना चालना मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात हा निधी जिल्ह्याला मिळून पुनर्वसित भागातील कामे मार्गी लागणार आहेत.
दर्यापूर तालुक्यात बाभळी भाग-१, बाभळी भाग-२ व बाभळी भाग-३ या पुनर्वसित गावांत ३० लक्ष २५ हजार रुपये निधीतून अंतर्गत खडीच्या रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. दर्यापूर भाग-१ या पुनर्वसित भागात दोन लाख निधीतून अंतर्गत खडीच्या रस्त्यांचे बांधकाम होणार आहे. सांगवा खुर्द येथे ११ लक्ष ५० हजार निधीतून व कान्होली येथे ११ लक्ष २५ हजार निधीतून अंतर्गत खडी रस्ते बांधकाम होणार आहे.
अमरावती तालुक्यात देवरी गावठाणातील पुनर्वसित भागात ९ लक्ष ५५ हजार निधीतून अंतर्गत रस्ते व नाली बांधकाम, रेवसा येथे १२ लक्ष २१ हजार निधीतून अंतर्गत रस्ते व नाली बांधकाम, पुसदा येथे ११ लक्ष १५ हजार रुपये, तर देवरा येथे ४ लक्ष २३ हजार निधीतून रस्ते व नाली बांधकाम होणार आहे. प्राप्त निधीनुसार कामांना वेळीच चालना द्यावी. पुनर्वसित भागातील नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण असावीत. ती विहित वेळेत पूर्ण करावीत. कामांच्या प्रगतीबाबत वेळोवेळी माहिती सादर करावी. पुढील टप्प्यातील निधीही वेळेत उपलब्ध करून दिला जाईल, असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी यंत्रणेला दिले आहेत.
बॉक्स
असा मिळाला निधी
अमरावती तालुक्यातील देवरी, रेवसा, पुसदा व देवरा या गावठाणातील पूर पुनर्वसित भागात रस्ते, नाली बांधकाम व विविध नागरी सुविधांसाठी प्रशासकीय मान्यता यापूर्वीच प्राप्त आहे. या सुविधांसाठी पहिल्या टप्प्यात ३७ लाख १४ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दर्यापूर तालुक्यातील बाभळी भाग-१, बाभळी भाग-२, बाभळी भाग-३, दर्यापूर भाग-१, सांगवा खु., कान्होली येथे रस्ते बांधकामासाठी ५५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
000