जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल : महसूल, एफडीएची संयुक्त कारवाईअमरावती : राज्यात गुटखाबंदी असताना शहरात राजरोसपणे गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गुटखा तस्करीची दखल घेत अन्न व औषधी प्रशासन आणि महसूल विभागाला कारवाईचे निर्देश दिलेत. त्यानुसार स्थानिक जाफरजीन प्लॉट परिसरातील अग्रवाल टॉवरमधील पाच गोदामात धाड टाकून सुमारे ९० लाख रूपये किमतीचा गुटखा मंगळवारी पकडण्यात आला. येथील कल्याणी ट्रेडर्स, जय भोले ट्रेडर्स यांच्यावर नियमानुसार कारवाईचा प्रस्ताव तयार करून गुटखा सील करण्यात आला.जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांच्याकडे काही नागरिकांनी शहरात गुटख्याची तस्करी होत असल्याची तक्रार नोंदविली. गुटखा शहरात कसा व कोठून येतो आणि कुठे ठेवला जातो, हे रेखाचित्राद्वारे सांगण्यात आले. गुटखाविक्रीतून कोट्यवधीची उलाढाल होत असून यात अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी सामील असल्याची नागरिकांची ओरड आहे. गल्लीबोळात गुटखा विकला जात असताना ठोस कारवाई केली जात नाही, असा आक्षेप घेत नागरिकांनी जिल्हा प्रशासनावर बोट ठेवले. त्याअनुशंगाने जिल्हाधिकारी गीत्ते यांनी नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईची जबाबदारी सोपविली. धाडसत्र राबविण्यासाठी उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदारांच्या नेतृत्वात तीन पथके तयार करून एका पथकाची जबाबदारी तहसीलदार सुरेश बगळे यांच्या शिरावर देण्यात आली. एफडीएचे सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे, तहसीलदार सुरेश बगळे यांनी जाफरजीन प्लॉट भागात अग्रवाल टॉवरमधील गोदामात गुटखा साठवून ठेवलेल्या ठिकाणी धाड टाकली.
९० लाखांचा गुटखा पकडला
By admin | Updated: June 29, 2016 00:14 IST