अमरावती : डीपीसीनेे अग्निशमन सेवा आणि आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरणासाठी दिलेला ६.७३ कोटींचा निधी महापालिकेकडे विनावापर पडून आहे. या निधीमधून सेवांचे बळकटीकरण करण्याची मागणी बसपा गटनेता चेतन पवार यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.
अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण या शीर्षातंर्गत जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९, सन २०१९-२० व सन २०२०-२१ द्वारे ६.७३ कोटींचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीमधून सेवांच्या बळकटीकरणाचे कामे त्वरेने होणे अपेक्षित असताना निधी तसाच पडून आहे. याकडे पवार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
राज्यात अलीकडे विरार येथीळ कोविड रुग्णालयास आग लागून कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. सध्या उन्हाळ्याची स्थिती आहे व या काळात महापालिकेचा अग्निशमन विभाग सुसज्ज असणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण त्वरित करावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.