बेटी बचाओंचा संदेश : धारणी ते अहमदाबाद सात दिवसांत प्रवासधारणी : मनात जिद्द असली तर कोणतेही काम कोणत्याही वयात करता येते, असाच अनुभव सध्या मेळघाटवासीयांना होत आहे. धारणी येथील ललित गणेशलाल जोशी ऊर्फ काका महाराज वयाच्या ६५ व्या वर्षी ६५० किलोमीटरचा प्रवास करीत "बेटी बचाओ"चा संदेश देत आहेत. काका महाराज यांनी उतारवयात काही तरी करण्याचा निश्चिय करून धारणी ते अहमदाबाद ६५० किलोमीटरची सायकल यात्रा करण्याचा निश्चय केला. सुुरुवातीला कठीण वाटणारी ही यात्रा या वयात करू नये, असे अनेकांनी त्यांना सांगितले. मात्र ठरविलेले ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी ही यात्रा सुरू केली. या यात्रा केवळ पर्यटन नव्हे, तर संदेश देणारी ठरली आहे. आपल्या या सायकल यात्रेच्या माध्यमातून काका महाराज बेटी बचाव, बेटी पढाव व स्वच्छ भारत अभियानाचा जागर करीत आहेत. १ एप्रिल रोजी काका महाराजांनी धारणी येथून सायकल यात्रेला प्रारंभ केला. केवळ सहा दिवसांत ६ एप्रिल रोजी तब्बल ६५० किलोमीटर अंतर पार करून ते अहमदाबादला पोहचले आहेत. या यात्रेदरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी मुली व महिलांना स्वच्छता व सरकारच्या बेटी बचावचा संदेश दिला. या यात्रेदरम्यान त्यांनी ज्या ठिकाणी मार्गदर्शन केले त्या सर्व ठिकाणी त्यांचे यात्रेचे स्वागत करून उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. ६५० किलोमीटरच्या या प्रवासात त्यांनी तीन राज्यातून प्रवास केला. महाराष्ट्राच्या मेळघाटातून सुरू झालेली ही यात्रा मध्यप्रदेशाच्या मार्गे गुजरातच्या अहमदाबाद येथे पोहचली आहे. मेळघाटातील एका व्यक्तीने ६५ व्या वर्षी ६५० किलोमीटरचा प्रवास करून अनोखा विक्रम केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
६५ वर्षीय ज्येष्ठाची अनोखी यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 00:19 IST