अमरावती: आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून जिल्हाभरातील २ हजार ७६ जागांसाठी तब्बल ५ हजार ९४० अर्ज दाखल झाले आहेत. येत्या दोन-तीन दिवसात प्रवेशासाठी राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर होणार असून विद्यार्थी व पालकांचे या सोडून तिकडे लक्ष लागले आहे.
आरटीई ऑनलाईन अर्ज भरताना सुरुवातीला तिच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया रखडली होती. शिक्षण विभागातर्फे ही तांत्रिक समस्या सोडविण्यात आल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. आरटीई प्रवेशासाठी सुरुवातीला ३ ते २१ मार्च ही मुदत देण्यात आली होती. मात्र यातील अनेक दिवस प्रक्रिया सुरू नसल्याने अनेक पालकांना अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे प्रवेश अर्जासाठी विहित मुदतीत ३० मार्च पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातून ५ हजार ९४० विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. प्रवेशासाठी मागील वर्षीप्रमाणे यंदाही एकच सोडत काढली जाणार आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. शहर व जिल्ह्यातील २४४ शाळांनी नोंदणी केली असून त्यात २ हजार ७६ जागा उपलब्ध आहेत.
बॉक्स
प्रवेशासाठी ही कागदपत्रे अनिवार्य
सोडत जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना फेरीनिहाय प्रवेश दिला जाईल. ज्या विद्यार्थ्यांना लॉटरीमध्ये संधी मिळेल त्यांच्या प्रवेशासाठी रहिवाशांचा पत्ता असणारा पुरावा, जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी स्तरावर स्थापन केलेल्या पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे.