जिल्हा परिषद; १४१ नवीन वर्गखोल्यांची कामे केव्हा
अमरावती : लाॅकडाऊनच्य काळात अवकाळी पावसासोबतच धडकलेल्या वादळी वाऱ्याने खेड्यापाड्यातील जिल्हा परिषदेच्या सन २०२०-२१ या वर्षात ४१६ वर्गखोल्यांची दुरुस्ती आणि ११६ नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम अद्यापही पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे प्राथमिक शिक्षण विभागाने या सर्व कामांना प्रशासकीय मान्यतासुद्धा दिली आहे. असे असताना कामे पूर्ण न झाल्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांची अवस्था बिकट झाली आहे, तर काही शाळा खोल्या अपघातप्रवण झाल्या आहेत. नवीन शैक्षणिक सत्र तोंडावर येत असताना बांधकामे पूर्ण करण्यास झेडपी यंत्रणा अपयशी ठरली आहे. केवळ दुरुस्तीच्या कामांचे १०० व नवीन वर्ग खोल्यांचे बांधकामचे ३० एवढ्या कामांचे कार्यरंभ आदेश बांधकाम विभागाकडून देण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मात्र, इतर कामे का सुरू झाली नाहीत याबाबत कुणीही माहिती घेत नाही अन् विचारत पण नाही. परिणामी रविवारी (दि.१३ जून) मोर्शी तालुक्यातील उदखेड येथील शाळेच्या इमारतीची भिंत पडून सातजण जखमी झाले आहेत. असे असताना शिकस्त वर्गखोल्याची दुरुस्ती व नवीन बांधकाम वर्षानुवर्ष का केली जात नाहीत, असा प्रश्न पालकवर्गातून उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या १४ तालुक्यांतील ४१६ वर्ग खोल्यांच्या शाळा दुरुस्तीसाठी सुमारे १३ कोटी ५७ लाख व नवीन खोल्यांच्या बांधकामासाठी १३ कोटी ३९ लाख ५० हजार रुपयांचा निधी गतवर्षी जिल्हा वार्षिक योजनेमधून जिल्हा नियोजन समितीने उपलब्ध करून दिला असताना ग्रामीण भागातील शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्याचे बांधकाम वेळेत पूर्ण का होत नाही, हा खरा प्रश्न आहे. ही कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना बसवून शिक्षण घ्यावे का, असे तर प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरून समजायचे का?
बॉक्स
४१६ खोल्यांची दुरुस्ती आवश्यक
अमरावती तालुक्यातील ५४, भातकुली २१, नांदगाव खंडेश्र्वर १८, चांदूर रेल्वे २१, धामनगांव रेल्वे ३१, तिवसा ३७, मोर्शी २९, वरूड ३७, चांदूर बाजार २२, दर्यापूर २७, अंजनगाव सुर्जी ३५, अचलपूर ३५, चिखलदरा २१ आणि धारणी २८ अशा एकूण ४१६ वर्गखोल्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
बॉक्स
१४१ नवीन खोल्यांचे बांधकाम केव्हा
जिल्हा परिषदेच्या १४१ वर्गखोल्यांच्या नवीन बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात अमरावती तालुक्यातील १३, भातकुली ०८, नांदगाव खंडेश्र्वर २१, चांदूर रेल्वे ०८, धामनगाव रेल्वे ०९, तिवसा ०८,मोर्शी ०६, वरूड ०५, चांदूर बाजार १५, दर्यापूर १३, अंजनगाव सुर्जी ०८, अचलपूर १३, चिखलदरा ०८ आणि धारणी ०६ अशा एकूण १४१ वर्गखोल्यांचे नवीन बांधकाम करणे आवश्यक आहे. यामधील केवळ २५ ते ३० खोल्यांचेच बांधकामाबाबत कार्यारंभ दिले आहेत. हा अपवाद वगळला तर अन्य कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत.
बॉक्स
धोकादायक खोल्या
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील खोल्या मोठ्या प्रमाणात धोकादायक बनल्या आहेत. सोबतच अनेक शाळांच्या इमारती जुन्या असल्याने या शिकस्त झाल्या आहेत. त्यामुळे या वर्गखोल्या धोकादायक बनल्या असून, अपघातप्रवण झाल्या आहेत. परिणामी या खोल्यांची दुरुस्ती व बांधकामे तातडीने पूर्ण न केल्यास १३ जूनलाा मोर्शी तालुक्यात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती घडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे.
कोट
जिल्हा परिषदेच्या ४१६ शाळांच्या दुरुस्तीसह १४१ नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामांना शिक्षण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. सोबतच वरील कामांसाठीचा निधीही वर्ग करण्यात आला आहे. पुढील कारवाई ही बांधकाम विभागामार्फत केली जात आहे.
एजाज खान
शिक्षणाधिकारी प्राथमिक
कोट
जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसह नवीन वर्गखोल्यांची कामे मंजूर आहेत. याबाबत बांधकाम विभागाने काय कारवाई केली याचा विस्तृत आढावा घेतला जाईल आणि शाळांची ही कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाला आदेश देऊन अंमलबजाणी करण्याचा प्रयन्न राहील.
श्रीराम कुलकर्णी
अतिरिक्त सीईओ