चौकशी सुरु : नाकाबंदीदरम्यान गोपालनगर ‘टी-पॉर्इंट’वरील घटना अमरावती : जिल्हा मध्यवर्ती बँकेची ३.७० कोटींची रोख वाहून नेणाऱ्या वाहनाला पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास पकडले. गोपालनगर ‘टी-पॉर्इंट’वर मंगळवारी नाकाबंदीदरम्यान हा प्रकार उघड झाला असून राजापेठ पोलिसांनी चारचाकी वाहनांसह रोख जप्त केली आहे. यासंदर्भात पोलीस उपायुक्त विवेक पानसरे चौकशी करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भष्ट्राचाराला आळा घालण्याच्या उद्देशाने पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्या. या नोटा बँकांमध्ये जमा करण्याचे आवाहन केले. त्यानुसार विविध बँकांमध्ये खातेदारांकडून पाचशे व हजारांच्या नोटा जमा केल्या जात आहेत. मात्र, या नोटा बदलविण्याच्या उद्देशाने त्यांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरु केली आहे. मंगळवारी मध्यरात्री गोपालनगर टी-पॉर्इंटवर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पीएसआय मुळे, गुन्हे शाखेचे पथक, राजापेठ, मुख्यालय व वाहतूक शाखेचे पोलीस त्यामार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत होते. दरम्यान पोलिसांनी वाहन क्रमांक एम.एच. २७ एच.-९६०६ ची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे ३.७० कोटी रूपयांच्या पाचशे व हजारांच्या नोटा पोलिसांना आढळून आल्या.विना बंदुकधारी सुरक्षा रक्षकअमरावती : त्या वाहनात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चालक निलेश चौधरी, कॅशियर चव्हाण, शिपाई विजय मळसने व सुरक्षा रक्षक राजेश भेले बसले होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता जिल्ह्यातील विविध शाखेत गोळा झालेल्या नोटा मध्यवर्ती बँकेत नेत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, ही कोट्यवधीची रोख पोत्यात भरून असल्याचे निदर्शनास आले. तसेच शिपायाजवळ सुरक्षेच्या दृष्टीने बंदूक सुद्धा नसल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे या नोटांसंदर्भात पोलिसांना अधिक संशय बळावला. पोलिसांनी त्या वाहनांसह रोख जप्त करून ठाण्यात नेली. याप्रकरणी बुधवारी सकाळीपासून नोटांसंदर्भात चौकशी सुरु करण्यात आली. ही चौकशी सायंकाळपर्यंत पूर्ण झाली नव्हती अशी पोलीस सुत्रांकडून माहिती मिळाली. त्या रोखीच्या व्यवहारासंदर्भात इत्यंभूत माहिती व पडताळणीचे काम सुरुच होते.
३.७० कोटी रोख वाहून नेणारे एडीसीचे वाहन पकडले
By admin | Updated: November 17, 2016 00:09 IST