एकाच बसमध्ये पाठविले अमरावतीला, वरुड पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेची पहिल्यांदाच कारवाईवरूड : तालुक्यात होऊ घातलेल्या ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वरूड पोलिसांनी दोन परवानाधारक दारू विक्रेत्यांसह ३७ अवैध दारू विक्रेत्यांना ३० डिसेंबर रोजी एकाच बसमध्ये अमरावती येथे स्थानिक गुन्हे शाखेत हजर केले. त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले.
ठाणेदार तथा आयपीएस अधिकारी श्रेणिक लोढा यांच्या नेतृत्वात वरूड तालुक्यात पहिल्यांदाचही ही कारवाई करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरूड पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने ३९ अवैध दारूविक्रेत्यांवर सीआरपीसी कायद्यांतर्गत कलम ११० अन्वये कारवाई केली. निवडणूककाळात दारू वाटप करून लोकशाहीप्रणालीला गालबोट लावणाऱ्या अवैध दारू विक्रेते व चिल्लर दारूची ठोक विक्री करणाऱ्या परवानाधारक दारूविक्रेत्यांवर सदर कारवाई करण्यात आली, गतकाळात तीन किंवा त्यापेक्षा अवैध दारूविक्रीचे गुन्हे असलेल्या तालुक्यातील ३७ अवैध दारू विक्रेत्यांसह दोन परवानाधारक दारू विक्रेत्यांचा यात समावेश होता. या सर्वांना वरूड पोलिसांनी नोटीसद्वारे हजर राहण्यास सांगितले. या सर्वांना बुधवारी अमरावती येथे स्थानिक गुन्हे शाखेमध्ये हजर करण्यात आले. तीन वर्षांत पुन्हा असा गुन्हा केल्यास एक लाख रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यासंदर्भात हमीपत्र घेऊन जामिनावर त्यांना सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वरूड पोलिसांनी दिली आहे.