न्यायासाठी वृद्धाची फरफट : जोशी आयुर्वेदिक हॉस्पीटलकडून अन्यायअमरावती : अंबादेवी रोडवरील जोशी आयुर्वेदिक हॉस्पीटलमध्ये ३५ वर्ष रुग्णसेवा देणाऱ्या वृध्दाला केवळ ३० हजाराचा मोबदला देण्यात आला. यासंदर्भात न्याय मिळविण्यासाठी वैद्य विशारद कंम्पाऊ डर चंद्रप्रकाश रामैय्या येंडे यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना निवेदन सादर करून न्यायाची अपेक्षा केली आहे. माहितीनुसार ८१ वर्षीय चंद्रप्रकाश येंडे हे १९५९ मध्ये जोशी आयुर्वेदिक हॉस्पीटलमध्ये रुजू झाले होते. त्यांनी पाच वर्ष ड्रेसर, पाच वर्ष असिस्टंट कंम्पाऊंडर व वीस वर्ष वैद्य विशारद पदावर रुग्णसेवा दिली. सर्व कर्मचाऱ्याप्रमाणेच ते सकाळी ९ ते दुपारी १२.३० आणि सायंकाळी ५ ते ८.३० या वेळेत काम करायचे. आठ तास रुग्णसेवा केल्यानंतरही हॉस्पिटलचे संचालक पार्टटाईम म्हणजेच चार तासानुसारच वेतन द्यायचे. ही बाब कर्मचाऱ्यांना माहिती नव्हती. ही माहिती होताच कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार दिली आहे. रुग्णालयाची प्रगती व्हावी, या उद्देशाने जोशी ट्रस्टने हे रुग्णालय अंबादेवी संस्थानाला ३० वर्षाच्या करारनाम्यावर दिले. त्यामध्ये ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना योग्यतेनुसार पुन्हा रुजू करून घ्यावे, असे नमुद करण्यात आले होते. मात्र, ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी तीन वर्षानंतर कर्मचाऱ्यांना काढून टाकले व साध्या कागदावर नोटीस बजावली. त्या नोटीसवर दोन्ही ट्रस्टचे नाव नाही, नोटीस केव्हाची आहे, त्याची तारीख नाही केवळ सही आहे. त्यावर स्टॅम्प नाही, ६० वर्षांनंतर सेवानिवृत्ती होते व हे खासगी रुग्णालय आहे, असे सांगून त्यांना कमी केले. येंडे यांना ३५ वर्षांच्या सेवेसाठी जोशी ट्रस्टकडून २६ हजार व अंबादेवी संस्थानकडून ४ हजार ६८ रुपये असे एकूण ३० हजार ६८ रुपये देण्यात आले. यासंदर्भात त्यासह अन्य कर्मचाऱ्यांनीही कामगार कल्याण कार्यालयात तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार या प्रकरणाची संपूर्ण प्रक्रिया चालली. अखेर कामगार न्यायालयात केस खारिज केली. त्यामुळे अजुनही वृध्द येंडे यांची न्यायासाठी भटकंती सुरु आहे.
३५ वर्षांच्या रुग्णसेवेचा मोबदला केवळ ३० हजार
By admin | Updated: October 6, 2016 00:37 IST