पेरणीची तयारी : शेतकऱ्यांकडे ६० हजार क्विंटल बियाणे उपलब्धसुरेश सवळे - चांदूरबाजारजिल्ह्यातील शेतकरी व व्यापारी तसेच वखार महामंडळाच्या गोदामात साठवलेल्या सोयाबीन बियाण्यांची तपासणी कृषी विभागाकडून करण्यात आली. त्यात शेतकऱ्यांकडे ६० हजार ४७०, व्यापाऱ्यांकडे १३ हजार १००, वखार महामंडळाच्या गोदामात १३ हजार तर प्रक्रिया केंद्रावर २९ हजार क्विंटल सोयाबीन असल्याचे या पाहणीतून उघड झाले आहे.येत्या हंगामात जिल्ह्यासाठी खरिपात ३ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रासाठी २ लाख ७९ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे खर्ची पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. त्यानुसार शासकीय व खासगी कंपन्यांनी १ लाख ३० हजार क्विंटल सोयाबीन उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे १ लाख ४९ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी बियाणे बदलाचे प्रमाण घटविण्यात आले. ही उपाय योजना करूनही तब्बल ८० हजार क्विंटल बियाणे कमी पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा खरीप पूर्व आढावा बैठकीत शेतकरी, व्यापारी, वखार महामंडळ आणि प्रक्रिया केंद्रावरील सोयाबीन साठ्याची तपासणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्हाभर मोहीम राबविली. त्यातून २ लाख ४५ हजार क्विंटल सोयाबीन उपलब्ध असल्याची बाब पुढे आली. सोयाबनांचा संभाव्य तुटवडा व बियाण्यांचे भाव वाढल्याने शेतकरी घरगुती बियाणे वापरत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले सोयाबीन विक्री होणार की नाही, या चिंतेने व्यापारी धास्तावले आहेत. अशातच मान्सून लांबणीवर पडल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.
२.७९ लाख क्विंटल सोयाबीनची गरज
By admin | Updated: June 19, 2014 23:37 IST