अमरावती : बालकांचे १५ टक्के मृत्यू न्यूमोनियामुळे होत असल्याने बालकांना आता यासाठी प्रतिबंधक न्यूमोकोकल लसीचे तीन डोस देण्यात येणार आहे. नियमित लसीकरण मोहिमेत या लसीची भर पडली आहे. यामध्ये खासगी रुग्णालयात १२ हजारांचे असणारे डोस आता शहरातील एक वर्षाचे आतील बालकांना मोफत देण्यात येणार आहे. यासंदर्भात महापालिकेत बुधवारी कार्यशाळा पार पडली.
या पीव्हीसी लसीचे दीड महिना व तीन महिने असे डोस आहेत व बूस्टर डोस दीड वर्षांनी घेणे आवश्यक आहे. खासगीत महाग असणाऱ्या या लसीचे बालकांना नि:शुल्क डोस देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, केंद्र व उपकेंद्राच्या माध्यमातून नियमित लसीकरणात या आजारावरदेखील लसीकरण करण्यात येणार आहे व जिल्ह्यात ही मोहीम लवकरच सुरू होणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. ठोसर यांनी कार्यशाळेत सांगितले. कार्यशाळेला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विक्रांत राजूरकर, डॉ. जयश्री नांदूरकर यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.