पालकमंत्र्यांचे प्रयत्न : ४३ गावांतील ४१२२ घरांच्या बांधकामाला गती अमरावती : जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी १० कोटी ६६ लाख ९० हजार रुपयांचा निधी महसूल व पुनर्वसन विभागाच्यावतीने मंजूर करण्यात आला असून तसा शासन निर्णय १७ मार्च रोजी निर्गमित करण्यात आला आहे. याबाबत ५ फेब्रवारी २०१६ मध्ये पालकमंत्री पोटे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याकरिता महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक घेण्यात आली होती. यावेळी आ.अनिल बोंडे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव गोविंदराज, उपसचिव मंदार पोहरे, आडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, पूरग्रस्त व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्ह्यातील ५४ गावांतील ५०२० घरांच्या बांधकामाऐवजी ४३ गावांतील ४१२२ घरांच्या पुनर्वसनाला शासनाने अंतिम मान्यता दिली आहे. त्यानुसार घर बांधणीसाठी पहिल्या व दुसऱ्या टप्प्याकरीता एकूण १७ कोटी ७ लक्ष रुपये, नागरी सुविधांकरिता १२ कोटी ४२ लक्ष रुपये आणि वलगाव येथील पुनर्वसनाच्या भूसंपादनासाठी ४ कोटी २० लक्ष रुपये इतक्या निधीची आवश्यकता होती. त्यानुसार १० कोटी रुपयांचा निधी घर बांधकामासाठी वितरित करण्यात आला होता. आता १० कोटी ६६ लाख ९० हजारांचा निधी महसूल व पुनर्वसन विभागाच्यावतीने मंजूर करण्यात आल्याने अमरावती जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या अपूर्ण कामाला गती मिळणार आहे. महसूलमंत्री खडसे यांनी जिल्ह्यातील ४३ गावांतील पुनर्वसनाच्या कामासाठी सर्वतोपरी मदत केल्यामुळे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी शुक्रवारी विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे आभार मानले आहेत.
पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ११ कोटी मंजूर
By admin | Updated: March 19, 2016 00:10 IST