रवि राणांचा पाठपुरावा : २४.७० कोटींच्या कामाला प्रशासकीय मान्यता अमरावती : तब्बल नऊ महिने रखडलेल्या छत्री तलावाच्या सौंदर्यीकरणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता यांनी यासंबंधी १२.३५ कोटींच्या ‘वर्क आॅर्डर’वर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे २४.७० कोटींची प्रकल्प किंमत असलेल्या २२ कामांपैकी १० कामांना लवकरच सुरूवात होईल. काही अटी-शर्ती ठेऊन आयुक्तांनी २४.७० कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली. राज्यशासनाने दिलेल्या अर्ध्या वाट्यातून छत्रीतलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. ८ मार्च २०१६ च्या शासननिर्णयान्वये नगरविकास विभागाने महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी-सुविधा विकास योजनेंतर्गत २४.७० कोटींच्या छत्रीतलाव सौंदर्यीकरण व परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाला मंजुरी दिली होती. यात १२.३५ कोटी रुपये देण्यास महापालिकेने स्पष्ट नकार दिला. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने महापालिकेचा उर्वरित वाटाही राज्यशासनाने द्यावा, असा ठराव सरकारला पाठविण्यात आला. त्यासंबंधी तत्कालीन आणि विद्यमान आयुक्तांनी नगरविकास विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र, काहीही हशील झाले नाही. दुसरीकडे राज्याचा वाटा म्हणून १२.३५ कोटींचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला. त्यासंबंधी या कामाला प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी आ. रवि राणा यांनी पुढाकार घेतला. विभागीय आयुक्तांनी घालून दिलेल्या अटी प्रशासकीय मान्यता देताना विभागीय आयुक्तांनी अटी/शर्ती घालून दिल्या आहेत. प्रस्तावातील करावयाचे बांधकाम हे विकास आराखडा व विकास नियमावलीत तरतुदींशी विसंगत राहणार नाही, या अटींच्या अधीन राहून ही मंजुरी देण्यात आली आहे. याची महापालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. नगरविकास विभागाच्या प्रधानसचिवांना पाठविलेल्या पत्राच्या अनुषंगाने अमरावती महापालिकेने शासनाकडे पाठपुरावा करावा व निधी प्राप्त झाल्यानंतर उर्वरित १२.३५ कोटींच्या कामाचे कार्यारंभ आदेश द्यावेत, अशी अट विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी घालून दिली आहे.
छत्रीतलाव सौंदर्यीकरणाच्या १० कामांचे कार्यारंभ आदेश
By admin | Updated: December 26, 2016 00:20 IST