अकोला : प्रेमाचे प्रतीक समजल्या जाणार्या व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. १४ फेब्रुवारीला हजारो तरुण-तरुणी हा दिवस साजरा करणार असल्यामुळे फुलांचे भाव गगनाला भिडले असून, ग्रीटिंग्जचेही भाव वाढले आहेत. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो. व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याला आपल्याकडे विरोध असला तरी तरुण-तरुणी हा दिवस मोठय़ा उत्साहात साजरा करतात. रविवारपासून शहरात तरुण-तरुणींकडून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची तयारी सुरू झाली असून, विविध ग्रीटिंग्ज व भेटवस्तू खरेदी करण्यात आल्या आहेत. शहरात सिव्हिल लाइन चौक, बसस्थानक, गांधी चौक, राऊतवाडी व जवाहरनगर चौक या ठिकाणी फुलांची विक्री होते. शुक्रवारपासून फुलांची मागणी वाढल्यामुळे भावातही वाढ झाली आहे. गुलाबाच्या फुलांना विशेष मागणी आहे. ग्रीटिंग्जची मागणी वाढल्यामुळे भावातही वाढ झाली आहे. व्हॅलेंटाइन डे निमित्त देण्यासाठी विविध ग्रीटिंग्ज बाजारात उपलब्ध झाले आहेत. तरुण-तरुणी या ग्रीटिंग्जची मोठय़ा प्रमाणात खरेदी करीत आहेत. काही पक्षांनी हा दिवस साजरा करण्यासाठी विरोध केला आहे. मात्र, त्यानंतरही तरुणांच्या उत्साहाला उधाण आले असून, विविध महाविद्यालये व कोचिंग क्लासेसमध्ये हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. अनेकांनी शनिवार व रविवारी पर्यटन करण्याचीही योजना आखली आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’साठी तरुणाई सज्ज
By admin | Updated: February 14, 2015 01:16 IST