अकोला: जुने शहरातील हमजा प्लॉट परिसरामध्ये मंगळवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास ८४ हजार ५00 रुपयांच्या रोकडसह स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी युवकास अटक केली. हा युवक परिसरात पैसे वाटप करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. हमजा प्लॉटमध्ये राहणारा राजू नाईक ऊर्फ मोहम्मद इरफान अब्दुल सत्तार (३0) याच्याकडे रोकडे असून, तो ही रोकड वाटप करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर फड यांना मिळाली. त्यांनी हमजा प्लॉटमधून राजू नाईक याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील ८४ हजार रुपयांची रोकड जप्त करून त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले. या ठिकाणी त्याची कसून चौकशी सुरू होती; परंतु राजू नाईक याने त्याला ही रोकड कोणत्या राजकीय नेत्याने दिली, कशासाठी दिली, तो कोणत्या राजकीय पक्षाशी निगडित आहे. याची माहिती पोलिसांना दिली नाही. पोलिस रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी करीत आहेत. बुधवारी चौकशीतून या रोकडसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनात एएसआय चंदू पाटील, मनोहर मोहोड, जितेंद्र हरणे, शेख हसन, अजय नागरे, विजू बावस्कार यांनी केली.
८४ हजारांच्या रोकडसह युवक गजाआड
By admin | Updated: October 15, 2014 01:38 IST